धाराशिव: “माझी निवृत्ती जवळ आलीय, मी कशाला फंदात पडू?” अशी उर्मट भूमिका घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अखेर ‘धाराशिव लाइव्ह’ च्या बातमीने ताळ्यावर आणले आहे. बोगस एक्झिट पोल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या धाराशिव नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी विश्वंभर सोनखेडकर यांना अखेर जनक्षोभ आणि प्रसारमाध्यमांच्या दणक्यामुळे सायबर पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे.
या प्रकरणी दिशाभूल करणारा ‘धाराशिव 2.0’ (Dharashiv 2.0) या पेजचा ॲडमिन मनोज घायाळ याच्यावर सायबर पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखेर कायद्याचा बडगा उगारला
निवडणूक काळात बोगस एक्झिट पोल प्रसिद्ध करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावल्याप्रकरणी ‘धाराशिव लाइव्ह’ने आवाज उठवला होता. या दणक्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली. स्वतः उपमुख्याधिकारी विश्वंभर सोनखेडकर यांनी सायबर सेल गाठून फिर्याद दिली.
गुन्ह्याचा तपशील आणि कलमे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर खोटा प्रचार करणे, शासकीय आदेशाचा अवमान करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग केल्याप्रकरणी खालीलप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे:
-
फिर्यादी: विश्वंभर सोनखेडकर (उपमुख्याधिकारी, धाराशिव नगर परिषद)
-
आरोपी: मनोज घायाळ (ॲडमिन, धाराशिव 2.0)
-
पोलीस ठाणे: सायबर पोलीस स्टेशन, धाराशिव.
लागू करण्यात आलेली कलमे:
आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कडक कलमे लावण्यात आली आहेत:
-
लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१: कलम १२६ (A) – (एक्झिट पोल बंदीचा भंग).
-
भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३:
-
कलम २२३: (शासकीय आदेशाची अवज्ञा करणे).
-
कलम ३३७: (जनतेच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे कृत्य/ बेजबाबदार वर्तन).
-
कलम ३५३: (सार्वजनिक उपद्रव आणि चुकीची माहिती पसरवणे).
-
-
माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act): कलम ६६ (s) (संगणक प्रणालीचा गैरवापर/फसवणूक).
प्रशासनाकडून धडा, पण विलंब का?
निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी 9 डिसेंबरला आदेश देऊनही गुन्हा दाखल करण्यास 3 दिवस का लागले? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मात्र, ‘धाराशिव लाइव्ह‘ने हे प्रकरण लावून धरल्यामुळे प्रशासनाला झुकावे लागले आणि दोषींवर कारवाई करावी लागली, हे या कारवाईने सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर फेक नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांना हा एक कडक इशारा मानला जात आहे.







