धाराशिव – नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेच्या (NMMS) २०२४-२५ निकालात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील एका केंद्रावर सामूहिक कॉपी झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाने केला आहे. महासंघाने याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना निवेदन सादर केले असून, लोहारा येथील केंद्र क्रमांक ८२१४ वरील परीक्षेची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी ५ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच जाहीर झालेल्या NMMS परीक्षेच्या इयत्ता आठवीसाठीच्या निवड यादीचे अवलोकन केले असता धक्कादायक बाब समोर आली. धाराशिव जिल्ह्यासाठी एकूण १९१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले गेले आहेत, त्यापैकी तब्बल ११५ विद्यार्थी हे लोहारा तालुक्यातील वसंतदादा पाटील विद्यालय (केंद्र क्र. ८२१४) या एकाच केंद्रावरील आहेत. या केंद्रावर सुमारे २३० विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. उर्वरित संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून केवळ ७६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या केंद्रावरील पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितल्याची माहिती मिळाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच, एकाच शाळेतील शिक्षकांची नियुक्ती हेतुपुरस्सर पर्यवेक्षणासाठी करण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे पेपर क्रमांक २ मध्ये अनेक विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, SEBC प्रवर्गातून निवड झालेल्या १० विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थी याच लोहारा केंद्रातील असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांवर अन्याय होत असून, त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे, असे महासंघाचे म्हणणे आहे. त्यामुळे लोहारा येथील केंद्र क्रमांक ८२१४ वर झालेली परीक्षा रद्द करून तेथील विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घ्यावी, तसेच दोषी केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांवर कठोर कारवाई करून गुणवंत विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी जोरदार मागणी महासंघाने केली आहे.
या निवेदनाची प्रत धाराशिवचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनाही योग्य कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. आता या प्रकरणी परीक्षा परिषद काय भूमिका घेते याकडे विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
Video