धाराशिव – काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांचे ‘मानसपुत्र ‘ बसवराज पाटील – मुरूमकर यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपचा लोकसभेचा मार्ग सुकर झाला असून, शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा हादरा बसला आहे.
बसवराज पाटील – मुरूमकर हे गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. सुरुवातीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष, नंतर तीन वेळा आमदार ( उमरगा विधानसभा १९९९, औसा विधानसभा २००९, २०१४ ) म्हणून निवडून आलेल्या बसवराज पाटील यांचा २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या अभिमन्यू पवार यांनी औसामध्ये पराभव केल्यामुळे ते राजकीय विजनवासात होते. त्यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद होते, पण गेल्या सहा महिन्यापासून ते काँग्रेसपासून अलिप्त होते.
बसवराज पाटील यांचा उमरगा आणि औसा विधानसभा मतदारसंघात मोठा दबदबा आहे. त्यांनी मुरूमजवळ उभा केलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीत आहे. तसेच त्यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक संस्था अडचणीत आहेत. महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन महायुतीचे सरकार येताच, त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते, त्यातून मार्ग काढण्यासाठी बसवराज पाटील – मुरूमकर यांनी काँग्रेसशी काडीमोड घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात उमरगा, औसा , तुळजापूर, बार्शी तालुक्यात लिंगायत मतदार मोठ्या प्रमाणात आहे. हा समाज आलुरे गुरुजी यांच्यानंतर बसवराज पाटील यांना मानणारा आहे. शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ‘करेक्ट कार्यक्रम ‘ करण्यासाठीच बसवराज पाटील यांना भाजपमध्ये घेण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.
बसवराज पाटील यांना भाजपमध्ये आणण्यासाठी बिदर ( कर्नाटक ) चे खासदार भगवंत खुबा ( केंद्रीय राज्य मंत्री, नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय एवं केंद्रीय राज्य मंत्री, रसायन और उर्वरक मंत्रालय ) यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट निघाल्याने आणि त्यांची खासदारकी रद्द झाल्याने भाजपकडे लिंगायत चेहरा नव्हता. बसवराज पाटील यांच्यामुळे प्रवेशामुळे धाराशिव, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यात भाजप अधिक मजबुत झाली आहे. बसवराज पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवडणूक जड जाणार , हे निश्चित आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील धाराशिव-कळंब, तुळजापूर, उमरगा-लोहारा, भूम-परंडा या चार विधानसभा मतदारसंघाचा तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.तुळजापूर ( राणा जगजितसिंह पाटील ) , औसा ( अभिमन्यू पवार) आणि बार्शी ( राजेंद्र राऊत ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे , उमरगा-लोहारा ( ज्ञानराज चौगुले ) भूम-परंडा ( तानाजी सावंत ) या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत तर धाराशिव-कळंब ( कैलास पाटील ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. एकंदरीत रागरंग पाहता महायुतीचे पारडे सध्या जड आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत खा. ओमराजे निंबाळकर हे मोदींच्या पाया पडून निवडून आले होते. मोदी लाटेमुळे आपण निवडून आल्याने त्यांनी लोकसभेत सांगितले होते. परंतु नंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतल्याने आणि त्यात शिवसेनेत दोन गट पडल्याने खा. ओमराजे निंबाळकर अडचणीत आले होते. त्यात महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसचे मातब्बर नेते बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने निंबाळकर हे एकाकी पडले आहेत. बसवराज पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने खा. ओमराजे निंबाळकर यांचा ‘करेक्ट कार्यक्रम होणार , हे जवळपास निश्चित आहे.
जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार
भाजपमध्ये प्रवेश केलेले बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील हे सध्या धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत तर बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण पाटील हे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कुमकुवत झाली असून, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे देखील बदलणार आहेत.