धाराशिव – तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील ( माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरु झाली आहे. याबाबत अर्चनाताई पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता , त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे ताईच्या राष्ट्रवादी प्रवेशाला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तरी धाराशिव लोकसभा मतदारसंघात अद्याप सामसूम आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे ‘एकला चलो रे’ प्रमाणे मतदारसंघ पिंजून काढत असले तरी, महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना धाराशिवच्या उमेदवारीबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील भाजप , शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) नेत्यांनी एकत्र बसून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत एकमुखी निर्णय घ्यावा, त्यावर मी ( देवेंद्र फडणवीस ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्कामोर्तब करतील,.असे उत्तर दिले. फडणवीस यांच्या या उत्तरामुळे महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना अखंड होती. शिवसेनेची युती भाजपबरोबर होती. धाराशिव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्याने या मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली आणि 5 लाख 96 हजार 640 मते घेऊन दणदणीत विजय संपादन केला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांना 4 लाख 69 हजार 74 मते मिळाली होती. राजकीय विजनवासात गेलेल्या ओमराजेना मोदी फॅक्टरमुळे खासदारकीचे लॉटरी लागली होती. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेऊन महाविकास आघाडी स्थापन केल्याने केंद्रात मोदी ( भाजप ) सरकार आणि धाराशिव मतदारसंघात विरोधी खासदार यामुळे गेल्या पाच वर्षात केंद्राकडून या मतदारसंघाला सापत्नपणाची वागणूक मिळाली. त्याचे खापर ओमराजेवर फोडण्यात येत असून, ओमराजेंनी गेल्या पाच वर्षात केंद्राची कोणती योजना या मतदारसंघात आणली, असा सवाल विरोधक करीत आहेत.
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळवून, जिल्ह्यात पहिल्यांदा ‘कमळ’ फुलवले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून त्यांना सहज उमेदवारी मिळू शकते, मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार बसवराज पाटील यांचे नाव आघाडीवर होते पण बसवराज पाटील यांनी देखील मराठा विरुद्ध लिंगायत असे जातीय समीकरण होईल म्हणून निवडणुक लढवण्यास नकार दिला. औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी देखील आपणास धाराशिव जिल्ह्यातील जनता स्वीकारणार नाही, असे म्हणून जास्त इंटरेस्ट दाखवला नाही. त्यानंतर सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव चर्चिले जात होते पण त्यांचा सर्व्हे निगेटिव्ह आल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्याची कोंडी झाली आहे.
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजेना तिकीट मिळावे यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १० कोटी पक्षनिधी देणारे शिवसेना ( शिंदे गट ) नेते आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांनी पुतणे धनंजय सावंत यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली , यासाठी प्रयत्नशील आहेत, पण धनंजय सावंत ओमराजे पुढे टिकाव धरणार नाही, त्यासाठी एक तर पालकमंत्री तानाजी सावंत यांनी स्वतः निवडणूक लढवावी अन्यथा धाराशिवच्या जागेचा आग्रह सोडून द्यावा असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचित केल्यामुळे सावंत यांची गोची झाली आहे. राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) धाराशिवच्या जागेवर हक्क सांगितला असला तरी त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही. अजित पवार गटाचे सुरेश बिराजदार उमेदवारी मिळावी यासाठी सर्वाधिक इच्छूक असले तरी या मतदारसंघातील भाजपचे आमदार आणि तानाजी सावंत सुरेश बिराजदार यांच्या नावाला म्हणावा तितका प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटू शकला नाही.
अर्चनाताई पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर …
मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवची जागा राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) ला सुटली आहे. राष्ट्रवादीकडून माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार इच्छुक असले तरी बिराजदार हे प्रभावी उमेदवार ठरू शकत नाहीत, म्हणून त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रम काळे यांचे नाव आघाडीवर होते, पण आणखी चार वर्षे कालावधी बाकी असल्याने काळे यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा आणि ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह अजित पवार यांनी धरला पण राणा पाटील यांनी आपले भाजपमध्ये व्यवस्थित बस्तान बसल्याचे सांगून नकार दिला. यातून मार्ग काढण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन महायुतीची उमेदवारी देण्याची कल्पना समोर आली आहे. त्यामुळे अर्चनाताई पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का ? हे उद्यापर्यंत स्पष्ट होणार आहे.
अर्चनाताई पाटील यांनी कधीच भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केलेला नाही. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर तेर जिल्हा परिषद गटातुन सदस्य म्हणून निवडून आलेल्या होत्या.त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर म्हणणे चुकीचे ठरेल.
-एक कार्यकर्ता