धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासनात सत्तेचा रंग चढवणारा, भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गरजेपेक्षा जास्त प्रकाशझोतात आलेला आणि एका विशिष्ट लॉबीला फायद्याची संधी देणारा जिल्हाधिकारी अखेर ‘बदली’च्या गंगेत वाहून गेला. डॉ. सचिन ओंबासे यांना सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं, आणि धाराशिवमध्ये एक वेगळाच उत्सव पाहायला मिळाला!
फटाक्यांचा फडशा आणि ‘कीड’ गेल्याचा जल्लोष!
मंगळवारी रात्री, एखाद्या विजयादशमीच्या उत्सवासारखं दृश्य होतं – पण हे ‘रावणदहन’ नव्हतं, तर धाराशिवच्या प्रशासनातून एका वादग्रस्त अधिकाऱ्याची एक्झिट! एका उत्साही कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी निवास आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
प्रहार संघटनेचे नेते अण्णासाहेब दराडे यांनी या घटनेवर रोखठोक शब्दांत टीका करत, “धाराशिव जिल्ह्याची कीड गेली,” असं स्पष्ट विधान केलं. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते अमोल जाधव यांनी याचा “धाराशिवची भ्रष्टाचारमुक्त वाटचाल” असा सकारात्मक अर्थ लावला.
कोटींच्या लिलावाचा ‘साहेबशाही’ कारभार
डॉ. ओंबासे यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या एक ना अनेक कहाण्या कानावर आल्या.
- बोगस नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्राचा गैरवापर करून प्रशासकीय सत्तेवर कसा कब्जा केला गेला, याचा पर्दाफाश झाल्यानंतरच लोकांचा आक्रोश उफाळून आला.
- पवनचक्की मालकांशी ‘गुप्त समझोता’ आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं, यावरूनही प्रशासकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
- तेरखेडा फटाका स्फोट प्रकरणात ‘हिवाळ्यात गवताला आग’ लागल्याचा हास्यास्पद अहवाल, ही तर प्रशासनातील थेट ‘मॅनेजमेंट’ची लाजिरवाणी केसस्टडी ठरली!
ED चौकशीची मागणी – आता ‘सोलापूरकर’ काय करणार?
धाराशिवमधून कोटीच्या कोटी उचलून सोलापुरात स्थानांतरित झालेल्या या ‘प्रशासकीय लॉटरी विजेत्या’ अधिकाऱ्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ED) मार्फत करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
➡ सोलापूरच्या नागरिकांनी या अधिकाऱ्याला थारा द्यायचा की तिथूनही हकालपट्टी करायची, हे आता पहाणं अत्यंत मजेशीर ठरेल! धाराशिवच्या लोकांनी अनुभवलेली ‘कीड’ सोलापुरकरांच्या डोक्यावर बसते की नाही, हे लवकरच कळेल.
धाराशिवची नवी पहाट!
या बदलीनंतर धाराशिवमधील भ्रष्टाचाराला कुठवर आळा बसेल हे लवकरच स्पष्ट होईल. पण एका गोष्टीवर सर्वांचं एकमत आहे – धाराशिवमधल्या ‘प्रशासकीय अंधारयुगाचा’ आता शेवट झाला आहे, आणि नवीन जिल्हाधिकारीसह पारदर्शक प्रशासनाची पहाट उगवेल!
Video