पारा (ता. वाशी, जि. धाराशिव) – सार्वजनिक शिवजयंती रॅलीदरम्यान आदलीचा स्फोट होऊन दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अक्षता संतोष भराटे (वय 12, रा. पारा) आणि महेंद्र किंचन गवळी (वय 35, रा. पारा) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आदली म्हणजे काय?
शिवजयंती आणि इतर उत्सवांमध्ये आदली हा पारंपरिक प्रकार वापरण्यात येतो. लोखंडी नळीमध्ये फटाक्यांची दारू भरून त्याला वात लावून हवेत उडवले जाते. मात्र, या वेळी नळीचे तोंड चुकीच्या दिशेने वळल्यामुळे दारू हवेत न जाता जमिनीवर उडाली आणि त्यामुळे अक्षता भराटे व महेंद्र गवळी गंभीर जखमी झाले.
स्फोटाचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने जखमींना उपचारासाठी हलवले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या घटनेमुळे शिवजयंती उत्सवावर दु:खाची छाया पडली असून, नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. संबंधित घटनेची चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.