धाराशिव : मिरवणुकीत धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाच जणांनी मिळून एका २७ वर्षीय तरुणाला गाडी आडवी लावून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना येडशी शिवारात घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरज अरुण अवधुत (वय २७, रा. तेरखेडा, ता. वाशी) हा तरुण २१ जुलै रोजी सायंकाळी चारच्या सुमारास आपल्या स्कॉर्पिओ गाडीने प्रवास करत होता. सोलापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बार्शी-लातूर रस्त्यावरील येडशी शिवारातील पुलाजवळ पोहोचला असता, आरोपींनी त्याला अडवले. काही वेळापूर्वी एका मिरवणुकीत झालेल्या धक्काबुक्कीचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी श्रीकांत शिंदे, पांडुरंग घुले (दोघे रा. तेरखेडा), प्रशांत शिंदे (रा. साकत), अविनाश मोराळे (रा. वडजी) आणि समाधान कवडे (रा. खामकरवाडी) हे स्कॉर्पिओ आणि थार गाडीतून आले. त्यांनी सुरजच्या गाडीला आपली गाडी आडवी लावून त्याला थांबवले. त्यानंतर गैरकायदेशीर जमाव जमवून, जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात सुरज गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर सुरज अवधुत यांनी २७ जुलै रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२६(२), १८९(२) आणि इतर विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.