धाराशिव – मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात असून, याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढला आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे – पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर त्यांना पाठींबा देण्यासाठी जिल्हाभरात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली तसेच अनेक ठिकाणी कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन कऱण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने तसेच एसटीची जाळपोळ केल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी संचारबंदी लागू केली आहे.
- पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी
- शाळा – कॉलेज बंद
- सर्व दुकाने बंद
- पाचवी ते दहावी पर्यंतची प्रथम सत्र परीक्षा रद्द
संचारबंदीच्या आदेशातून सूट कोणाला?
1. शासकीय / निमशासकीय कार्यालये.
2. दूध वितरण.
3. पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना.
4. सर्व बँका,
5. दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना.
6. रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था यांना सुट दिली आहे.
जिल्ह्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध भागात धरणे, आंदोलने,रस्तारोको व उपोषणे सुरू आहे.उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जाळण्यात आली. शेजारच्या बीड जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत.या घटनांच्या पडसादामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेस मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे.त्यामुळे जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (2) चे संचारबंदीचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी लागू केले आहे.
आज 31 ऑक्टोबर रोजी वाशी तालुक्यातील इंदापूर,धाराशिव तालुक्यातील येडशी व तुळजापूर येथे ठिकठिकाणी रास्ता रोको,बैलगाडी व रेलरोको करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील संचारबंदीचे हे आदेश शैक्षणिक संस्था,शाळा, महाविद्यालये व दुकाने यांनाही लागू राहतील.या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र,ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगता येणार नाही.या आदेशातून शासकीय /निमशासकीय कार्यालये, दूध वितरण,पिण्याचे पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना,सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, दवाखाने,वैद्यकीय केंद्र, औषधी दुकाने, रुग्णवाहिका विद्युत पुरवठा,ऑइल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने,प्रसार माध्यमे,मीडिया, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आयटी आस्थापना,अंत्यविधी व अंत्ययात्रा यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
धाराशिव जिल्हयात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमतेस मोठया प्रमाणावर हानी पोहचत आहे. याबाबत मी स्वतः खात्री केलेली आहे. त्यामुळे जिल्हयात संचारबंदीचे आदेश लागू करण्याच्या निर्णयाप्रत मी आलो असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
त्याअर्थी वेळेअभावी सर्व संबंधीत यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने मी सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, धाराशिव मला प्राप्त अंगीभूत अधिकाराचा वापर करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (2) अन्वये एकतर्फी धाराशिव जिल्हा हद्दीपर्यंत पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करत आहे. सदरील संचारबंदी आदेश शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. या कालावधीत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत,
ताजे अपडेट
- उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस जाळली
- शिंगोलीजवळ रास्ता रोको केल्याने वाहनाच्या प्रचंड रांगा
तुरोरी येथे कर्नाटकची बस पेटवली
उमरगा तालुक्यामध्ये तुरोरी येथे कर्नाटकमधून उमरग्याकडे येणारी कर्नाटकमधील एसटी बस आंदोलकांनी पेटवली. बसमधील प्रवासी उतरवून ही बस पेटवण्यात आली. भालकी ते पुण्याला जाणारी बस होती. बस मध्ये 39 प्रवाशी होते. सर्व प्रवाशांना खाली उतरवून बसला आग लावण्यात आली.
एसटीवर दगडफेक .
ढोकी :फिर्यादी नामे- धर्मराज राजेंद्र मोरे, वय 46 वर्षे, व्यवसाय- बस चालक, धाराशिव आगार, रा. सातेफळ, ता. कळंब जि. धाराशिव हे लातुर ते धाराशिव बस क्र एमएच 20 बीएल 1623 ही घेवून जात असताना दि. 29.10.2023 रोजी 13.30 वा. सु. पेट्रोलपंप ढोकी बसस्टॉप येथे प्रवांशाना उतरवण्याकरीता बस थांबली असता आरोपी नामे-1) अविनाश माणिक लंगडे, 2) सचिन बापूराव लंगडे दोघे रा. ढोकी ता. जि. धाराशिव व इतर 2 अनोळखी इसम यांनी दगड हातात घेवून बसवर मरत असताना फिर्यादी हे म्हणाले की दगड मारु नका असे म्हणत असताना नमुद व्यक्तीने तु गप्प बस अशी दमदाटी करुन बसचे समोरील काचेवर दगड मारुन बसचे काच फोडून 10,000₹ नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- धर्मराज मोरे यांनी दि.29.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 427, 186 भा.दं.वि.सं. सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :फिर्यादी नामे- किरण विशाल शिंदे, वय 39 वर्षे, व्यवसाय- बस चालक, कळंब आगार, रा. बावी, ता. जि. धाराशिव हे बस क्र एमएच 14 बीटी 2029 ही घेवून जात असताना दि. 29.10.2023 रोजी 16.15 वा. सु. येडशी बसस्थानक येथे प्रवांशाना उतरवण्याकरीता बस थांबली असता आरोपी नामे- दत्ता मोहन तुपे, वय 30 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव व इतर अनोळखी इसमांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देवून बसचे समोरील काचेवर दगड व आग विजवण्याचे सिलेंडर मारुन बसचे समोरील व बाजूचे काच फोडून 30,000 ₹ नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- किरण शिंदे यांनी दि.29.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 427 भा.दं.वि.सं. सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.