अणदूर – अणदूर येथील श्री खंडोबा मंदिराच्या पाठीमागे बांधण्यात आलेले भक्त निवासचे बांधकाम अत्यंत निकृष्ट झाल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. या कामात अनेक दोष आढळून आल्याने त्याची केंद्रीय राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून तांत्रिक तपासणी करावी तसेच सदर कामाची रक्कम वसूलपात्र असल्याचे निरीक्षण या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचा स्थानिक कार्यकर्ता दयानंद मुडके यांची फसवेगिरी उघड झाली आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा मंदिराच्या पाठीमागे बांधण्यात आलेल्या भक्त निवासाला ऐन पावसाळ्यात गळती लागली होती. त्याची बातमी सर्वप्रथम धाराशिव लाइव्हने ४ सप्टेंबर रोजी दिली होती. त्यानंतर त्याची लेखी तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे केली असता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते.
अणदूर : श्री खंडोबा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या भवनला पावसाळयात गळती
त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्यासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भक्त निवासला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांना चौकशी अहवाल सुपूर्द केला असून, , त्यात सदर कामात अनेक त्रुटी असल्याचे आणि काम निकृष्ट झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. अंदाजपत्रकात हॉलचा आकार ५.५५ x १५.२७ मीटर असा असला तरी प्रत्यक्ष बांधकाम ५ .५ x १५.२७ मीटर करण्यात आले आहे. प्रत्यक्ष पाहणी वेळी सात ठिकाणी गळती आढळली तसेच काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नाही, हे नमूद करण्यात आले आहे.
अणदूरच्या निकृष्ट कामाची झेडपीच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून पाहणी
हे निकृष्ट पद्धतीने झाल्याने बांधकामास दिलेली रक्कम वसूल करावी, तसेच या कामाची केंद्रीय राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून तांत्रिक तपासणी करावी, असे सुचवण्यात आले आहे. या कामाचे कंत्राट धारूर ता. धाराशिव येथील निलेश शिंदे यांना देण्यात आले होते पण त्यांच्या नावावर हे काम भाजपचा स्थानिक कार्यकर्ता दयानंद मुडके यांनी केले होते. मुडके यांची यांची फसवेगिरी यानिमित्ताने उघड झाली आहे.