धाराशिव – एका 25 वर्षीय विवाहित महिलेला तिच्या राहत्या घरी बोलावून घेऊन गावातील एका तरुणाने तब्बल तीन दिवस तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला 25 जुलै 2024 रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून 27 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्या राहत्या घरी होती. या कालावधीत आरोपी तरुणाने तिला फोन करून बोलावून घेतले आणि नंतर तिला वेगवेगळ्या तीन ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर आरोपीने पीडितेला धमकी दिली की, जर तिने याबाबत कोणाला काही सांगितले तर तो तिला आणि तिच्या पतीला जीवे मारेल.
या घटनेने प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या पीडित महिलेने 28 जुलै रोजी धाराशिव जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची दखल घेत भादंविच्या कलम 64(1), 78, 351(2), 351(3) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पीडितेचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
पीडितेच्या सुरक्षेच्या कारणास्तव तिचे नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.