धाराशिव: राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नसतो. कधी मंत्रिपद मिळता मिळता हुलकावणी देतं, तर कधी न मिळालेल्या पदाचा थाट अनुभवायला मिळतो. असाच काहीसा ‘हटके’ प्रकार धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या एका ‘नेमप्लेट’ने संपूर्ण जिल्ह्यात धुरळा उडवून दिला आहे.
‘भावी पालकमंत्री’ ते ‘मित्रा’चे उपाध्यक्ष
तुळजापूरमधून दुसऱ्यांदा निवडून आलेले आणि बहुतेक काळ सत्तेत राहिलेले राणा पाटील यांना दोन्ही वेळा मंत्रिपदाने हुलकावणी दिली. समर्थकांनी सोशल मीडियावर ‘भावी पालकमंत्री’ म्हणून हवा केली, पण ती हवा हवेतच विरली. अखेर, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ‘मित्रा’ (Maharashtra Institution for Transformation) या संस्थेचे उपाध्यक्षपद दिले.1
उपाध्यक्षपद मिळाल्यापासून आमदार साहेबांचा रुबाबच पालटला. पालकमंत्री थाटात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका, अधिकाऱ्यांसोबत चर्चा आणि दौरे सुरू झाले. सगळं काही ‘ओके’मध्ये चाललं होतं. कार्यकर्तेही खूश होते की, ‘दादा’ला मंत्रिपदाचा दर्जा मिळाला. या उत्साहावर कळस चढवला तो जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील एका ‘नेमप्लेट’ने!
आणि नेमप्लेटवर झळकले ‘राज्यमंत्री’!
१ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. राणा पाटील यांच्या नावापुढे चक्क ‘राज्यमंत्री’ अशी पाटी लावण्यात आली. ही पाटी पाहून कार्यकर्ते भारावले आणि आमदार साहेबांच्या चेहऱ्यावरची स्माईलही वाढली. जणू काही जिल्ह्याला नवे राज्यमंत्री मिळाल्याचा आनंद सर्वत्र होता.
माहितीच्या अधिकाराने फोडला ‘आनंदाचा फुगा’
पण म्हणतात ना, सत्य फार काळ लपत नाही. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात ‘मित्रा’च्या उपाध्यक्षपदाच्या दर्जाविषयी माहिती मागवली आणि सगळाच खेळ समोर आला. सरकारी कागदपत्रांनुसार, ‘मित्रा’च्या उपाध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा कोणताही दर्जा देण्यात आलेला नाही!
या बातमीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मग ती ‘राज्यमंत्री’ लिहिलेली नेमप्लेट आली कुठून? ती कुणी लावली? आमदारांना खूश करण्यासाठी अधिकाऱ्यांनी हा प्रताप केला की स्वतः आमदारांच्याच सूचनेनुसार हा ‘प्रोटोकॉल’ पाळला गेला? लोकांमध्ये आता चर्चांना उधाण आले आहे.
एकीकडे, जिल्ह्यातील दुसरे सत्ताधारी आमदार तानाजी सावंत मंत्रिपद गेल्यापासून पुण्यातील उद्योग सांभाळण्यात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे राणा पाटील यांना न मिळालेल्या पदाच्या नेमप्लेटमुळे प्रसिद्धी मिळत आहे. हा सत्तेचा मोह आहे की कार्यकर्त्यांचा अतिउत्साह, हे येणारा काळच ठरवेल. पण तोपर्यंत, धाराशिवच्या राजकारणात या ‘नेमप्लेट’ प्रकरणाची चर्चा मात्र चांगलीच रंगत राहणार, हे नक्की!