धाराशिव: वडिलांना झालेल्या मारहाणीची पोलिसांनी योग्य दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या एका तरुण मुलाने आणि त्याच्या आईने थेट पोलिस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव शहरात खळबळ उडाली आहे.
व्यंकटेश सतीश पडिले (वय २२) आणि त्यांची आई संगीता सतीश पडिले अशी विष प्राशन केलेल्या माय-लेकांची नावे आहेत. दोघांनाही तातडीने धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, संगीता पडिले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी व्यंकटेश यांचे वडील सतीश पडिले यांना पैशाच्या कारणावरून मारहाण झाली होती. याप्रकरणी त्यांचा मुलगा व्यंकटेशपडिले यांनी आनंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी या गंभीर घटनेची नोंद दखलपात्र गुन्हा म्हणून न करता, केवळ अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल केला.
आपल्या वडिलांना मारहाण होऊनही पोलीस केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवत असल्याने पडिले कुटुंबीय हवालदिल झाले होते. त्यांनी वारंवार पोलिसांना विनंती करूनही दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याच्या भावनेने व्यंकटेश आणि त्यांची आई संगीता यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ माय-लेकाने थेट आनंद नगर पोलिस ठाण्यात जाऊन विषारी औषध प्राशन केले. या अनपेक्षित प्रकारामुळे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. उपस्थित पोलिसांनी तात्काळ दोघांनाही रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.