धाराशिव: जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर आणि कळंब तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन मोटरसायकली आणि शेतकऱ्याच्या सोलार पंपाचा संच चोरून नेला आहे. या घटनांमध्ये एकूण २ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल लंपास झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरग्यात हॉस्पिटलमधून दोन दुचाकी चोरीला
चोरीच्या घटनांमध्ये उमरगा शहरातील साई हॉस्पिटल परिसर चोरट्यांचे लक्ष्य ठरल्याचे दिसत आहे. तुगाव तांडा येथील अविनाश भास्कर राठोड (वय २७) यांची ५५,००० रुपये किमतीची बजाज कंपनीची मोटरसायकल (क्र. एमएच २५ ए. वाय. ८३३३) ४ ऑगस्टच्या रात्री हॉस्पिटल परिसरातून चोरीला गेली.
त्याचप्रमाणे, कसगी येथील सिद्दांना सुभाष कलशेट्टी (वय ४६) यांची ३०,००० रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच २५ झेड ३७१२) २९ जुलै रोजी सकाळी साई हॉस्पिटलजवळूनच चोरीला गेली होती. या दोन्ही घटनांची फिर्याद ७ ऑगस्ट रोजी उमरगा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
तुळजापुरात घरासमोरून युनिकॉर्न लंपास
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील विजय रमेश बनसोडे (वय २८) यांची ७५,००० रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (क्र. एमएच २५ बी.डी. ९९६६) ६ ऑगस्टच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात व्यक्तींनी चोरून नेली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंबमध्ये शेतकऱ्याला फटका, सोलार पॅनलची चोरी
कळंब तालुक्यात चोरट्यांनी थेट शेतकऱ्याच्या शेती साहित्यावर डल्ला मारला. येरमाळा येथील रहिवासी कैलास संतोष पेजगुडे यांच्या मस्सा शिवारातील शेत गट क्र. २५ मधून सोलार पंपाच्या १३ प्लेट, केबल आणि फाउंडेशन असा एकूण ४०,००० रुपयांचा मुद्देमाल ५ ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्या चोरून नेण्यात आला. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या सर्व घटनांप्रकरणी ७ ऑगस्ट रोजी संबंधित पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. एकाच वेळी जिल्ह्यात घडलेल्या या घटनांमुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.