धाराशिव: धाराशिव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (दि. २ डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, मतदानाच्या अवघ्या काही तास आधीच सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या एका कथित आणि बनावट ‘एक्झिट पोल’मुळे शहरात राजकीय खळबळ उडाली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग करून मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी ‘धाराशिव 2.0’ (Dharashiv 2.0) आणि इतर संबंधित सोशल मीडिया पेजेसवर त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मतदार राकेश हनुमंतराव सुर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नेमका प्रकार काय?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल (Exit Poll) प्रसिद्ध करण्यास मनाई आहे. असे असतानाही, ‘धाराशिव 2.0’, ‘jilha_dharashiv’ आणि ‘all.about_dharashiv’ या सोशल मीडिया हँडल्सवरून एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. तक्रारदार सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ एका बनावट (Bogus) टीव्ही चॅनलचा रिपोर्ट वापरून तयार करण्यात आला असून त्यात खालील दावे करण्यात आले आहेत:
१. भाजपच्या उमेदवार सौ. नेहा काकडे या विजयी होणार असल्याचे भासवले आहे.
२. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार सौ. परवीन खलिफा कुरेशी या दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दाखवले आहे.
मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न?
हा प्रकार म्हणजे मतदारांवर बेकायदेशीर रित्या प्रभाव टाकण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्याचा प्रयत्न असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अस्तित्वात नसलेल्या टीव्ही चॅनलचा वापर करून हा ‘फेक रिपोर्ट’ तयार करण्यात आला असून, हे भारतीय जनता पक्षाशी संगनमत करून केलेले कृत्य असल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे.
कारवाईची मागणी
सदर प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेला धोका निर्माण झाला असून मतदारांमध्ये संभ्रम पसरला आहे. त्यामुळे संबंधित सोशल मीडिया पेज चालकांवर आदर्श आचारसंहितेचा भंग, खोटी माहिती पसरवणे आणि बनावट दस्तऐवज वापरणे या कलमांखाली तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी विनंती राकेश सुर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. आता निवडणूक प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








