धाराशिव: धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत आचारसंहितेचा भंग करून मतदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर बनावट (फेक) एक्झिट पोल प्रसारित केल्याप्रकरणी ‘धाराशिव २.०’ (Dharashiv 2.0) सह इतर इन्स्टाग्राम पेजेसच्या ॲडमिन्स विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा धाराशिव लाइव्हने केला होता.
नेमकी घटना काय?
धाराशिव नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान नियोजित होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदानापूर्वीच्या ४८ तासांत (सायलंट पिरीयड) कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल किंवा जनमत चाचण्या प्रसिद्ध करण्यास बंदी असते. मात्र, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ‘धाराशिव २.०’ (Dharashiv 2.0), ‘जिल्हा धाराशिव’ (jilha dharashiv) आणि ‘ऑल अबाऊट धाराशिव’ (all about_dharashiv) या सोशल मीडिया पेजेसवरून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.
या व्हिडिओमध्ये एका बनावट (Bogus) टीव्ही चॅनेलचा वापर करून भाजपच्या उमेदवार सौ. नेहा काकडे या विजयी होत असल्याचे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार सौ. परवीन खलिफा कुरेशी या दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे भासवण्यात आले होते4.
तक्रार आणि गुन्हा दाखल
युवासेना तालुकाप्रमुख राकेश हनुमंत सूर्यवंशी आणि गोविंद कोळगे यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, मीडिया सर्व्हेलन्स कक्षाचे सनियंत्रण अधिकारी तथा पालिकेचे उपमुख्याधिकारी विश्वंभर वासुदेवराव सोनखेडकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली.
या कलमांखाली गुन्हा दाखल
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३, ३३७, ३५३ तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२६ (A) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) २००० चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शकील शेख करत आहेत.







