धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि दोन नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार आहेत. मात्र, तारखा जाहीर होताच राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला असून, यंदाची निवडणूक ‘थेट नगराध्यक्ष’ पद्धतीमुळे अत्यंत चुरशीची होणार आहे.
या निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील समीकरणांचा थेट परिणाम दिसणार आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीमध्ये (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) एकी असली, तरी जिल्ह्यात मात्र त्यांच्यात अनेक ठिकाणी ‘बेबनाव’ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जागावाटपावरून युतीमध्येच संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
त्याउलट, महाविकास आघाडीने (शिवसेना-ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गट) मात्र जिल्ह्यात एकत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्ह्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप या दोन पक्षांची ताकद मोठी असल्याने, अनेक ठिकाणी खरी लढत याच दोन पक्षांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
धाराशिव-तुळजापूरमध्ये प्रतिष्ठेची लढत
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी धाराशिव आणि तुळजापूर येथील लढती सर्वाधिक चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक असल्याने अनेकजण ‘गुडघ्याला बाशिंग बांधून’ उमेदवारीसाठी तयार आहेत.
विशेषतः धाराशिव शहरात भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास येथे सर्वात जास्त बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत. बंडखोरांना शांत करणे हेच भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे.
या ठिकाणी होणार निवडणुका:
- ८ नगरपालिका: धाराशिव, तुळजापूर, उमरगा, नळदुर्ग, मुरूम, भूम, परांडा, कळंब.
- २ नगर पंचायत: लोहारा आणि वाशी.
निवडणूक कार्यक्रम:
-
- नामनिर्देशन पत्र दाखल करणे: १० नोव्हेंबर पासून
- नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस: १७ नोव्हेंबर
- अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
- निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
- मतदान: २ डिसेंबर
- मतमोजणी: ३ डिसेंबर





