धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी पोलीस कस्टडीत असलेल्या तत्कालीन लेखापाल सुरज संपत बोर्डे यांची एसटीएस पथकाने नगर पालिकेत नेवून गैरव्यवहारातील गहाळ झालेली प्रमाणके शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगराध्यक्षाच्या कक्षात गैरव्यवहातील काही प्रमाणके सापडल्याने शहरात दिवसभर उलट – सुलट चर्चा सुरु होती.
धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन लेखापाल सुरज संपत बोर्डे यांना धाराशिव जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधीश मोरे मॅडम यांनी तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. बोर्डे यांची तीन दिवसाची पोलीस कस्टडी आज ( गुरुवारी ) संपत आहे. उद्या . १ डिसेंबर रोजी बोर्डे यांना पुन्हा कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.
दरम्यान , चौकशी पथकाने आज सूरज बोर्डे यास धाराशिव नगर पालिकेत दुपारी नेवून जवळपास पाच ते सहा तास कसून चौकशी केली. तसेच गैरव्यवहारातील कागदपत्रे , प्रमाणके तपासली. यावेळी बोर्डे यांनी नगराध्यक्षाच्या कक्षात गैरव्यवहातील काही प्रमाणके एसटीएस पथकाच्या स्वाधीन केली. त्यामुळे पालिका परिसरत उलट- सुलट चर्चा सुरु होती. बोर्डे यांनी गैरव्यवहार सहभागी असलेल्या काही लोकांची नावे सांगितली असल्याचे समजते. त्यामुळे काही माजी पदाधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.
बोर्डे यांना नगर पालिकेत आणल्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यामुळे कधी नव्हे अनेक पोलीस पालिका आवारात दिसत होते.
हे आहेत दोन गुन्हे
- आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद , धाराशिव 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद धाराशिव येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणि विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणीवपूर्वक लेखा विभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद धाराशिव ( रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब हा.मु. समर्थ नगर धाराशिव ) यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
- आरोपी नामे-1) हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, न.प. धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी 2) सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.21.01.2021 ते 18.11.2022 या कालावधीत नगर परिषद धाराशिव येथे “रमाई आवास योजना”च्या खात्यावर जमा असलेले 3,14,79,000 पैकी 2,93,14,078 रुपये शिल्लक असल्याचे दिसुन येते त्यांनी मंजुर झालेल्या कामावर खर्च न करता योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक केली आहे.तसेच “लोकशाहीर आण्णाभाउ साठे नागरी वस्ती सुधार योजना” सन 2019-20 अन्वये प्राप्त रक्कम 3,14,79,000 ₹ पैकी 21,64,922 एवढी रक्कम योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे धंदा- नोकरी लेखापाल नगर परिषद धाराशिव , रा. मस्सा खंडेश्वरी ता. कळंब हा. मु. रा. समर्थ नगर धाराशिव यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 409, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.