धाराशिव नगरपालिकेत मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या ‘क्रांतिकारी’ कारभाराचा नवा अध्याय समोर आला आहे. आता इथल्या विद्युत अभियंत्यालाच आरोग्य निरीक्षक बनवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, शहरात झाडलोट कमी आणि टेंडरमधल्या नोटा जास्त फिरत असल्याची चर्चा आहे!
चार महिन्यांपूर्वी आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे निवृत्त झाले, तेव्हापासून हे पद रिक्त होतं. पण मॅडमनी मोठ्या हुशारीनं विद्युत अभियंता कौस्तुभ घडे यांना ‘दिवे लावायला’ नव्हे, तर कचरा व्यवस्थापन सांभाळायला सांगितलं. बिचारे इंजिनिअर! एकीकडे ट्रान्सफॉर्मर आणि वायरिंग सांभाळायचं, तर दुसरीकडे शहराच्या आरोग्याचीही जबाबदारी. हा असा ‘शॉर्ट सर्किट’ पहिल्यांदाच झालाय!
कचऱ्याचा निस्तार नाही, पण टेंडरचा व्यापार जोरात!
नगरपालिकेने तब्बल आठ कोटी रुपयांचे स्वच्छता टेंडर काढले असून, दर महिन्याला तब्बल ५० लाखांचं बिल काढलं जातं. पण शहरात कचऱ्याचे ढीग कमी होण्याऐवजी वाढत चाललेत. असं दिसतंय की, कंत्राटदार आणि नगरपालिकेच्या ‘ मुख्याधिकारी मॅडम’’नी टेंडरच्या राशीवरच स्वच्छता मोहीम राबवली आहे. शहर कचऱ्यात बुडालंय, पण मॅडम आणि त्यांचे बगलबच्चे ‘मलिदा’त न्हालंय!
मुख्याधिकारींची ‘स्पेशल जागा’!
आरोग्य निरीक्षकाचं मूळ पद मुंबईहून भरती केलं गेलं, आणि गिरीजाराम माहेर आलेत ! हे अधिकारी इथं रुजूही झाले. पण चार महिने झाले तरी मॅडमनी त्यांना ‘कोपऱ्यात’ बसवून ठेवलंय. आता प्रश्न हा आहे की, काम करायला अधिकारी हवेत की ‘मॅडमच्या स्पेशल लिस्ट’मध्ये असलेले लोक?
नगरपालिकेत ‘स्वच्छ’ व्यवहार की ‘गर्द’ धंदा?
धाराशिव शहरात आरोग्याचा खेळखंडोबा सुरू आहे. कचऱ्याचे साम्राज्य वाढत चाललंय. लोक नाक धरून फिरत आहेत, पण मुख्याधिकारी मॅडम आणि त्यांच्या ‘बगलबच्च्या’ना मात्र या सगळ्यात काही तरी वेगळाच ‘गंध’ शोधतायत!
धाराशिवकरांनी आता ‘स्वच्छता अभियान’ हाती घ्यावं आणि आधीचं कचरा उचलण्याआधी ‘नगरपालिकेचा कचरा’ उचलणं महत्त्वाचं आहे!