धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात पान टपरी, हॉटेल्स, किराणा दुकान आदी ठिकाणी गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. हा गुटखा शेजारील कर्नाटक राज्यातील हुमानाबाद येथून येतो.बीड जिल्ह्यात जाणारा गुटखा देखील धाराशिव जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जातो. बीड जिल्ह्यातील दोन गुटखा तस्कर पोलिसांना मॅनेज करून लाखो रुपयाच्या गुटख्याची वाहतूक करीत होते. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यावर पाळत ठेवून, दोन गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हुमानाबाद येथून एक अशोक लेलॅड कंपनीचे वाहन (क्र एमएच 44 यु 2405) मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखाची वाहतुक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन त्यांनी नियुक्त केलेल्या पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जावून सदर वाहन थांबवून चेक केले असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला.
वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया कॉलनी बीड ता. जि. बीड असे सागिंतले. तसेच पथकाने त्यांचे ताब्यातील नमुद वाहनातुन हिरा पान मसाला 64 पोते, विमल पान मसाला 5 मोटे पोते, व्ही- 1 तंबाखु एक खाकी रंगाचे पोते, महा रॉयल 717 तंबाखु 32 हिरवट रंगाचे पोते, आओबाजी पान मसाला 15 पोते, रॉयल 220 तंबाखु 14 पोते, हिरा पान मसाला 14 पोते, रॉयल 717 तंबाखु 7 पोते, बॅग, पॉकेट सह अशोक लेलॅड कंपनीचे वाहन क्र एमएच 44 यु 2405 असा एकुण 28, 89, 740 ₹ किंमतीचा माल मिळून आला.
मिळून आलेला जप्त करुन माल सह आरोपी नामे-1) नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, 2) हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया कॉलनी बीड ता. जि. बीड यांना ताब्यात घेवून आरोपी विरुध्द पोलीस ठाणे मुरुम येथे गुरनं 124/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 188, 272, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पथकाने त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस मालासह मुरुम पोलीसांच्या ताब्यात दिले.
बीड जिल्ह्यातील या दोन गुटखा तस्कराचे येरमाळा येथून पोलीस मुख्यालयात बदली झालेल्या ‘केबी’ बरोबर आर्थिक संबंध होते. केबी मार्फत जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशनच्या कारभाऱ्याना दरमहा पॉकेट पोहच होत होते, पण केबीची पोलीस मुख्यालयात बदली झाल्यापासून बीड जिल्ह्यातील या गुटखा तस्करांचे कंबरडे मोडले आहे. या गुटखा तस्करांवर यापूर्वी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.