धाराशिव – धाराशिव नगर पालिकेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने जामीन देण्यास नकार देताच, येलगट्टे यांच्या वकिलांनी जामीन अर्ज परत घेतला आहे. त्यामुळे येलगट्टे यांची दिवाळी यंदा जिल्हा कारागृहातच साजरी होणार आहे.
धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळताच, येळगट्टे यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जामीनसाठी अर्ज दाखल केला होता, पण खंडपीठाने जामीन देण्यास नकार देताच, येलगट्टे यांच्या वकिलांनी जामीन अर्ज परत घेतला आहे.
जेव्हा जिल्हा न्यायालयात येलगट्टे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र ( चार्जशीट ) दाखल होईल तेव्हा जामीन अर्ज दाखल करावा, असे खंडपीठाने सुचवले आहे. त्यामुळे येलगट्टे यांची यंदाची दिवाळी जिल्हा कारागृहातच साजरी होणार आहे.
काय आहे प्रकरण ?
आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बोर्डे, पवार अद्याप फरार , पोलीस थंड
धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेले सुरज संपत बोर्डे ( तत्कालीन लेखापाल ) प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) यांना आनंदनगर पोलीस अटक करीत नसल्याने पोलीस आणि आरोपीचे साटेलोटे असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर सर्वच प्रकरणात निष्क्रिय ठरलेले असताना, दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखा मिळवण्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव हे सेवानिवृत्त झाल्यामुळे या जागेसाठी बांगर यांनी बीडच्या एका राजकीय नेत्याच्या माध्यमातून वशिला लावला आहे. अश्या निष्क्रिय पोलीस निरीक्षकाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे स्थानिक गुन्हे शाखेची खुर्ची देणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.