धाराशिव – धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ७ मधील राजकारण तापले आहे. या प्रभागातील भाजपचे उमेदवार अमित दिलीपराव शिंदे आणि त्यांच्या पत्नी वंदना अमित शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर आज प्रतिस्पर्धी उमेदवाराने हरकत घेतली आहे. अमित शिंदे हे नगर परिषदेचे ‘लाभधारक’ असल्याचा दावा करत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, यावर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक ७ (सर्वसाधारण) मधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कृष्णा पंडित मुंडे यांचे प्रतिनिधी बाळासाहेब वसंतराव सुभेदार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदवला आहे.
नेमका आक्षेप काय?
हरकत अर्जानुसार, उमेदवार अमित शिंदे हे धाराशिव नगर परिषदेचे आर्थिक लाभधारक आहेत. धाराशिव नगर परिषदेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील (सिटी सर्व्हे क्र. १०५, शीट क्र. ५९) दुकान क्रमांक १४, ज्याचे क्षेत्र २७.८८ चौ.मी. आहे, या जागेच्या वापरासाठी अमित शिंदे यांनी नगर परिषदेसोबत नोंदणीकृत करारनामा (क्र. ४६१५/२०२५) केलेला आहे.
शिवशक्ती डेव्हलपर्सने बीओटी तत्त्वावर हे संकुल बांधले असून, या मालमत्तेबाबत अमित शिंदे यांचा नगर परिषदेशी थेट आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा आक्षेपार्धात करण्यात आला आहे.
कायद्याचा आधार काय?
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमाचे कलम १६ (१) (आय) आणि १६ (१) (जे) नुसार, ज्या व्यक्तीचा नगर परिषदेच्या कोणत्याही कामात, करारात किंवा मालमत्तेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आर्थिक हितसंबंध असतो, अशी व्यक्ती नगर परिषदेचा सदस्य होण्यास अपात्र ठरते. याच नियमाचा आधार घेत अमित शिंदे आणि वंदना शिंदे (पती-पत्नी आणि एकत्र कुटुंब असल्याने दोघांचे हितसंबंध एकच) यांचा नामनिर्देशन अर्ज रद्द करावा, अशी मागणी कृष्णा मुंडे यांनी केली आहे.
या आक्षेपावर उद्या ( बुधवार ) सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे, अमित शिंदे हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. शिंदे यांची उमेदवारी कायम राहणार की रद्द होणार, याकडे प्रभागाचे लक्ष लागले आहे.







