नळदुर्ग: सोलापूर-तुळजापूर मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने ७१ वर्षीय वृद्ध महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कनिजफातेमा जिलेलाही शाहीन (वय ७१, रा. मसरत नगर, बीड) या सोमवारी, दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सोलापूरहून नळदुर्गकडे बसने प्रवास करत होत्या. दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास बसमध्ये गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने कनिजफातेमा यांच्या हातातील बॅगेची चैन उघडून त्यातील ऐवज चोरला.
चोरट्याने बॅगेतील ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक घड्याळ आणि ३,००० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. नळदुर्ग बस स्थानकात उतरल्यावर आपली बॅग उघडी दिसल्याने आणि आतील ऐवज गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना धक्का बसला.
या घटनेप्रकरणी कनिजफातेमा शाहीन यांनी मंगळवारी, दि. ५ ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू केला आहे. सणासुदीच्या काळात बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने प्रवाशांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.