धाराशिव – जिल्हा परिषद धाराशिवच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ आणि बेजबाबदार कारभारामुळे पटसंख्या अत्यल्प असलेल्या शाळा आजही चालू आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या केवळ २५ च्या आत असूनही शाळा सहीसलामत सुरू ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकारी आणि शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
उस्मानाबाद जिल्हा मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना धाराशिव यांनी या भोंगळ कारभाराविरोधात तक्रार अर्ज सादर केला होता. या अर्जानुसार, पवित्राबाई दैठणकर हायस्कूल रत्नापूर (ता. परंडा) येथे पटसंख्या कमी असूनदेखील, निलकंठेश्वर विद्यालय चिंचपूर (ता. परंडा) येथून विद्यार्थ्यांना जबरदस्तीने आणून शाळा भरवली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत आहे.
तसेच, प्रतिभाताई पवार हायस्कूल जवळा (नि.) परंडा येथील विद्यार्थी संख्या अवघी २५ असूनही शाळा सहीसलामत सुरू ठेवण्यात आली आहे. कायद्याच्या नियमानुसार शाळा बंद करण्याची आवश्यकता असतानाही, शिक्षण विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात टाकणाऱ्या या शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश का दिले जात नाहीत, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, आजवर शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी अनेक शिक्षण संस्थांना पाठीशी घातले असून, त्यांच्या या वर्तणुकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा वरदहस्त असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. चौकशीचे केवळ नाटक केले जात असून, प्रत्यक्षात कारवाई शून्य असल्याने विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा येत आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती परंडा यांना तपासणी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या अहवालाचा नेमका उपयोग काय, हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिक्षणाधिकारी (माध्य.) सुधा साळुंके यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रातील या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तातडीने कठोर पावले उचलून या शाळांच्या अनियमिततेवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.