धाराशिव – धाराशिव नगरपालिका हद्दीतील मिळकत क्रमांक 4127 मध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने उभारलेल्या गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या पुतळ्याच्या अनधिकृत स्थापनेबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयाने नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांना नोटीस बजावली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या 11 जुलै 2024 च्या आदेशानुसार, हा पुतळा विनापरवानगी उभारण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार, अशा अनधिकृत पुतळ्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाने मुख्याधिकाऱ्यांना पुतळा हटवण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाची मदत घेण्याचे निर्देश दिले होते. तथापि, मुख्याधिकाऱ्यांनी या कारवाईसाठी आवश्यक ती कार्यवाही न करता, अनावश्यक पत्रव्यवहार करून विलंब केल्याचे आढळून आले आहे.
यामुळे प्रशासकीय आणि कार्यालयीन शिस्तीचे उल्लंघन झाल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मुख्याधिकाऱ्यांचे हे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 च्या नियम 3 चे उल्लंघन करणारे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाने मुख्याधिकाऱ्यांना पुतळा हटवण्याच्या कारवाईची तारीख निश्चित करून त्याची माहिती कार्यालयाला देण्याचे निर्देश दिले आहेत.या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा धाराशिव लाइव्हने सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या माध्यमातून केला आहे. सुभेदार यांच्या तक्रारींवरूनच हा पुतळा हटवण्याची कार्यवाही सुरु आहे.
काय आहे प्रकरण ?
१० एप्रिल २०२४ रोजी, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांना पुतळा हटवण्यासाठी अंतिम नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये तीन दिवसांच्या आत पुतळा काढण्याचे निर्देश होते. या आदेशाचे पालन न झाल्यास प्रशासनाच्या वतीने पुढील कार्यवाही करण्याचा इशारा दिला गेला होता.
श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या प्रांगणात उभा करण्यात आलेला गुरुवर्य के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा वारंवार संधी देऊनही स्वतःहून काढून न टाकल्याने आता नगर परिषद मुख्याधिकारी यांनी, पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढला आहे. हा आदेश मिळून १३ दिवस झाले तरी धाराशिव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड या गप्प आहेत, फड यांनी हाताची घडी, तोंडावर बोट ठेवल्याने उलट – सुलट चर्चा सुरु आहे. फड यांनी पुतळा काढण्याऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून वेळकाढूपणा सुरु केला आहे. फड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून तारीख आणि वेळ मागितली असता, त्यावर उपविभागीय अधिकारी यांनी चांगलेच फटकारले आहे.
शाळेच्या प्रांगणातील मैदान विद्यार्थ्यांच्या क्रीडांगणासाठी शासनाने दिले होते. परंतु, त्या ठिकाणी शाळेची अनाधिकृत इमारत उभारली गेली. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी ही जागा शासनाची असल्याचे घोषित केले होते. तसेच, तत्कालीन जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सुधीर पाटील यांनी प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पुतळा उभारला.