धाराशिव: बँक खाते अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एका दूध डेअरी व्यावसायिकाला तब्बल २४ लाख ४७ हजार ५५७ रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात उघडकीस आली आहे. बनावट मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला लावून ही ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी तानाजी दत्तू भोसले (वय ४४, रा. जेजला, ता. भूम, जि. धाराशिव) हे येडेश्वरी दूध डेअरी चालवतात. २७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ते जेजला येथे असताना त्यांना ८२१८७२८६७६ या मोबाईल क्रमांकावरून एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण आयसीआयसीआय (ICICI) बँकेतून बोलत असल्याचे भासवले आणि भोसले यांचे बँक खाते अपडेट करायचे आहे, असे सांगितले.
विश्वास संपादन करण्यासाठी चोरट्याने भोसले यांच्याकडून त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती घेतली. त्यानंतर, त्याने भोसले यांच्या व्हॉट्सॲपवर आयडीबीआय (IDBI) बँकेची असल्याचे भासवून एक एपीके (APK) फाईल पाठवली आणि ती डाऊनलोड करण्यास सांगितले. भोसले यांनी ती फाईल डाऊनलोड करताच, सायबर चोरट्याने त्यांच्या येडेश्वरी दूध डेअरीच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने एकूण २४ लाख ४७ हजार ५५७ रुपये परस्पर काढून घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तानाजी भोसले यांनी २ एप्रिल २०२५ रोजी धाराशिव येथील सायबर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) (फसवणूक) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६(सी) (ओळख चोरी) आणि ६६(डी) (संगणक प्रणालीचा वापर करून फसवणूक) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे बँक ग्राहकांनी अनोळखी फोन कॉल्स किंवा मेसेजद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक करू नये, कोणतीही अनोळखी ॲप डाऊनलोड करू नयेत आणि आपली वैयक्तिक व बँक खात्याची गोपनीय माहिती कोणासही देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.







