धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील एका 29 वर्षीय तरुणाला ऑनलाईन रोजगाराच्या आमिषाने तब्बल 18 लाख 14 हजार 956 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सागर राम सांळुके या तरुणाला व्हॉट्सअॅपवरून आलेल्या एका मेसेजच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली.
मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे सागर यांनी विविध बँक खात्यांमध्ये आणि यूपीआय आयडीवर पैसे भरले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही. याप्रकरणी सागर यांनी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर राम सांळुके ( वय 29 वर्षे, रा. कामठा ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. गणेश नगर ता. जि. धाराशिव ) यांना 7320982450 या क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला होता. या मेसेजमध्ये ‘अधिक पैसे कमवण्यासाठी विविध आर्थिक कार्ये पूर्ण करा’ असे आमिष दाखवण्यात आले होते. सागर यांनी 25 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत विविध खात्यांमध्ये 18 लाखांहून अधिक रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली. मात्र, त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.
ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा
- कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक खात्याची माहिती देऊ नका.
- कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणत्याही अनोळखी अॅप डाउनलोड करू नका.
- जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका वाटत असेल तर ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधा.
आपण ऑनलाईन फसवणुकीबाबत अधिक माहितीसाठी सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.