धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात मोबाईल टॉवरवरील उपकरणे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, तामलवाडी, लोहारा आणि आनंदनगर पोलीस ठाण्यांत अशा घटनांचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अज्ञात चोरट्यांनी एअरटेल कंपनीच्या इंडस टॉवरवरील महत्त्वाचे उपकरणे लंपास केल्याने मोबाईल नेटवर्क सेवेलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
तामलवाडी येथील चोरी
20 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या आधी मसला खुर्द येथे एअरटेल कंपनीच्या इंडस टॉवरवरील आयवन डिवाईस (कॅम्बीयम 300 ईपीएमपी बीटीएसएनडीयु) अंदाजे 30,000 रुपयांचे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी महादेव पंडित धवन (वय 40, रा. खंडाळा, ता. तुळजापूर) यांनी 18 मार्च रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भा.दं.वि. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहारा येथे 60,000 रुपयांचे नुकसान
20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या आधी, मार्डी येथील मारुती जिंदा वाझमोडे यांच्या शेतातील इंडस टॉवरवरील आयवन डिवाईस अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. चोरी झालेल्या उपकरणांची अंदाजे किंमत 60,000 रुपये असून, अमोल काशीनाथ धवन (वय 37, रा. खंडाळा, ता. तुळजापूर) यांनी 18 मार्च रोजी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
धाराशिवमध्ये दोन उपकरणे चोरीला
13 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या आधी, धाराशिवच्या सांजा चौकातील पाटील यांच्या घरावरून एअरटेल कंपनीच्या इंडस टॉवरची दोन उपकरणे अज्ञात चोरट्यांनी पळवली. चोरी गेलेल्या उपकरणांची एकूण किंमत 60,000 रुपये असून, महादेव पंडित धवन यांनी 18 मार्च रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी कलम 303(2) अंतर्गत गुन्हे दाखल केले असून, चोरांचा शोध सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात मोबाईल टॉवरवरील उपकरणे चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने टेलिकॉम कंपन्यांनी सुरक्षेची अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.