धाराशिव : शहरातील अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला फी भरण्यास उशीर झाल्याने अपमानास्पद वागणूक देऊन शाळेतून घरी पाठवण्यात आल्याचा आरोप करत तिच्या पालकाने शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
अर्जदार सचिन हरिश्चंद्र मोरे यांनी शिक्षण अधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, धाराशिव यांच्याकडे ही लेखी तक्रार केली आहे. मोरे यांची मुलगी, वेदिका सचिन मोरे, अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहे. शाळेची फी भरण्यास विलंब झाल्याने त्यांना शाळेतून फोन आला होता. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १८ जून २०२५ रोजी फी भरण्याचे आश्वासन दिले होते.
तरीही, त्यांच्या मुलीला अपमानास्पद वागणूक देऊन वर्गाच्या बाहेर काढण्यात आले आणि तिला घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले, असे मोरे यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देता येत नाही किंवा वर्गाबाहेर काढता येत नाही, असे असतानाही अभिनव इंग्लिश स्कूलचे व्यवस्थापन असे प्रकार वारंवार करत असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. त्यांच्या मुलीसोबत इतरही अनेक विद्यार्थ्यांना सर्वांसमोर वर्गात किंवा स्टेजवर उभे करून अपमानित केले जाते, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी, शाळेच्या व्यवस्थापनाला योग्य ती समज देऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी विनंती सचिन मोरे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे. शिक्षण विभागाने १७ जून रोजी हे तक्रारपत्र स्वीकारले आहे.