धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील पदभार सोडून गेलेले माजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची ‘स्मृती’ अजूनही जिल्हाधिकारी निवासस्थानी कायम आहे. सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून पदभार सांभाळल्यानंतर एक महिना उलटला तरी ओम्बासे साहेबांची पाटी अजूनही ‘धाराशिव जिल्हाधिकारी’ म्हणून अभिमानाने मिरवते आहे.
धाराशिवकरांनी आता त्यांच्या पाटीला ‘शाश्वत जिल्हाधिकारी‘ म्हणून मान्यता देण्याचा विचार चालवला आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी तर पाटीला ‘स्मारक‘ म्हणून घोषित करण्याची मागणीही केली आहे.
धाराशिवचे नवीन जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी कार्यालयावर आपली पाटी ठोकली असली तरी निवासस्थानावर ओम्बासे साहेबांच्या पाटीचा अभेद्य किल्ला अजूनही टिकून आहे. हा किल्ला मोडण्याचे धाडस कोण करणार, यावर शहरात जोरदार चर्चा आहे.
धाराशिवकरांनी आता पाटीवरून वेगवेगळे अंदाज लावायला सुरुवात केली आहे. काहींनी पाटीला ‘विरासत‘ म्हटले आहे, तर काहींनी ‘स्मृतीचिन्ह‘ म्हणून मिरवण्याचा सल्ला दिला आहे.
आता महापालिकेच्या कामाचा व्याप सांभाळत असलेले डॉ. ओम्बासे सोलापुरात व्यस्त आहेत, पण त्यांच्या ‘पाटीची प्रतिमा’ अजूनही धाराशिवकरांच्या मनात आणि निवासस्थानी जिवंत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या पाटीला ‘ऐतिहासिक महत्त्व’ म्हणून संरक्षित करण्याचा प्रस्ताव दिला आहे का, यावर मात्र प्रशासनाने मौन बाळगले आहे.
तर, धाराशिवकरांनी ओम्बासे साहेबांच्या पाटीला ‘स्मारक‘ म्हणून ओळख देऊन ती कायमस्वरूपी ठेवावी का? हा प्रश्न आता शहरभर गाजत आहे.