धाराशिव: नियमांचे आणि अटींचे उल्लंघन करून बेकायदेशीर कृत्ये केल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाने धाराशिव तालुक्यातील ‘पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र’ यांचा परवाना तात्काळ रद्द केला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशाने ही कठोर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर कला केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आळणी येथील गट क्रमांक ३३३ मध्ये बाबासाहेब राजाभाऊ गाठे यांना ‘पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र’ चालवण्यासाठी प्रशासनाने परवाना दिला होता. लोकनाट्य कला सादरीकरण आणि सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रमांसाठी काही विशिष्ट अटी व शर्तींवर ही परवानगी देण्यात आली होती. मात्र, या केंद्रात परवान्यातील अटींचा भंग होत असल्याचे आणि बेकायदेशीर कृत्ये चालत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले.
हे वाचा – पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?
या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासानंतर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
या अहवालाच्या आधारे, नियम क्रमांक २२६ (ii) नुसार जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी ‘पिंजरा’ कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले. या केंद्राला भविष्यात कोणताही परवाना दिला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी वाशी तालुक्यातील ‘तुळजाई कला केंद्राचा’ परवाना देखील अशाच प्रकारे रद्द करण्यात आला होता. आता आणखी चार कला केंद्र प्रशासनाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.