धाराशिव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सिद्राम पोपट पवार नावाचा एक इसम धाराशिव आणि परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मोटारसायकली चोरी करून त्या आपल्या घराच्या बाजूला लपवून ठेवत आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सिद्राम पवारला ताब्यात घेतले. त्याच्या घराच्या शेजारी तपासणी केली असता चोरीच्या ८ मोटारसायकली आणि एक छोटा हत्ती वाहन आढळून आले. या सर्व मुद्देमालची किंमत ४ लाख ३५ हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांनी सिद्राम पवारची कसून चौकशी केली असता त्याने धाराशिव जिल्ह्यातील पांगरधरवाडी, कोंड, तुगाव या गावांसह सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पांगरी, भोगाव, सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ आणि पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर येथून या गाड्या चोरल्याची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी बजावली. या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यासह परिसरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.