धाराशिव: शहराच्या रस्त्यांवर फटाक्यांसारखे आवाज करत, कर्णकर्कश ध्वनिप्रदूषण पसरवत फिरणाऱ्या ‘बुलेटराजां’ना आणि इतर वाहनचालकांना धाराशिव वाहतूक पोलिसांनी आज चांगलाच धडा शिकवला. जवळपास ५० हून अधिक वाहनांचे बेकायदेशीर सायलेन्सर जप्त करून, ते रस्त्यावर मांडून चक्क रोड रोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनेक तरुण बुलेट व इतर गाड्यांना मॉडिफाइड सायलेन्सर लावून भरधाव वेगाने फिरत होते. या वाहनांमधून निघणाऱ्या प्रचंड आवाजामुळे नागरिक, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण त्रस्त झाले होते. या तक्रारींची गंभीर दखल घेत शहर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली.
या मोहिमेअंतर्गत, पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ५० हून अधिक बुलेट आणि इतर दुचाकींचे सायलेन्सर जप्त केले. केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता, या समस्येचे मूळच नष्ट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. जप्त केलेले सर्व सायलेन्सर छत्रपती शिवाजी चौकात रस्त्यावर रांगेत मांडण्यात आले आणि त्यानंतर चक्क रोड रोलर आणून त्यावरून चालवत त्यांचा अक्षरशः चक्काचूर करण्यात आला.
पोलिसांच्या या हटके कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. हौसेपोटी वाहनांमध्ये बदल करून इतरांना त्रास देणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. वाहतूक पोलिसांच्या या धडक कारवाईचे शहरातील नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
व्हिडीओ बघा
View this post on Instagram