धाराशिव : धाराशिव शहरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ही घटना १७ जून २०२५ रोजी सायंकाळी घडली. आरोपींकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, एक कोयता आणि वाहनांसह एकूण ५,०५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होते. मंगळवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता, तेरणा कॉलेजजवळ विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अंधारात चार ते पाच व्यक्ती संशयास्पदरित्या थांबल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. ही टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
शासकीय वाहन काही अंतरावर थांबवून पोलीस पायी जात असताना, दबा धरून बसलेल्यांपैकी दोघांनी पोलिसांना पाहताच मोटरसायकलवरून पळ काढला. मात्र, पथकाने इतर तिघांना पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
- धुपकिरण उर्फ अनिलशेट रामलगन चौधरी, वय ४७, रा. अरिवला (फुलपुर), जिल्हा बस्ती, उत्तरप्रदेश
- निलेश उर्फ कांचन संभाजी चव्हाण, वय ३२, रा. काकानगर, धाराशिव
- मुकेश शाम शिंदे, वय २४, रा. शिंगोली, धाराशिव
जप्त केलेला मुद्देमाल:
- एक गावठी बनावटीचे पिस्तूल (किंमत अंदाजे ७५,००० रुपये)
- तीन जिवंत काडतुसे (किंमत अंदाजे ६०० रुपये)
- एक लोखंडी कोयता (किंमत २०० रुपये)
- एक ह्युंदाई सँट्रो कार (किंमत अंदाजे २,३०,००० रुपये)
- एक बुलेट मोटरसायकल (किंमत अंदाजे १,५५,००० रुपये)
- एक होंडा ॲक्टिवा स्कुटी (किंमत अंदाजे ४५,००० रुपये)
या तिन्ही आरोपींविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.