धाराशिव – धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील मंजुर पदे भरण्याची प्रक्रिया दि.१९ जून ते २९ जून दरम्यान होणार आहे. याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उमेदवारांना महत्वाची सूचना केलीआहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदाची रिक्त पदे भरण्यासाठी यापुर्वीच जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील मंजुर पदे भरण्याची प्रक्रिया दि. 19.06.2024 ते दि.29.06.2024 पावेतो पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असुन यात चालक पोलीस शिपाई पदाच्या 44 जागा असुन त्याकरिता 4,503 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. तसेच पोलीस शिपाई पदाच्या 99 जागा असुन त्याकरिता 3,497 उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले आहेत.
प्रथम उमेदवारांना शारिरीक मोजमापाची चाचणी घेण्यात येईल. शारिरीक चाचणीमधील पात्र उमेदवारांची 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येणार असुन चालक पोलीस शिपाई यांची 50 गुणांची कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदाकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी एकाच दिवशी मैदानी चाचणी करिता सुचना प्राप्त झाली अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख देण्यात येईल. तसेच उमेदवारांनी शारिरिक चाचणी करीता येताना महाआयटी कडून प्राप्त झालेले आवेदन अर्ज व प्रवेशपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे तसेच उमेदवारांनी शारिरीक चाचणी करिता येताना आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना असे कागदपत्रे व स्वत:चे शैक्षणिक कागदपत्रे व पासपोर्ट साईजचे 05 फोटो सोबत आणावेत. पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.