धाराशिव: शहरात गोवंशीय प्राण्यांच्या मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका पिकअप टेम्पोवर धाराशिव शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६ लाख रुपये किमतीचे ३,००० किलो गोमांस आणि ८ लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो असा एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना ३० जून २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वैराग नाका रोडवर घडली.
धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, खिरणीमळा भागातून एका पिकअप टेम्पोमधून गोवंशीय जनावरांचे मांस विक्रीसाठी नेले जाणार आहे. या माहितीच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने वैराग नाका रोडवरील मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोर सापळा रचला.
रात्री सुमारे ८.३० वाजता, रसुलपुराकडून वैराग नाक्याकडे जाणाऱ्या एमएच २५ AJ ६४९५ या क्रमांकाच्या पिकअप टेम्पोला पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला. टेम्पोमधून दुर्गंधयुक्त पाणी गळत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी टेम्पोच्या मागील हौद्यात तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांचे मांस आढळून आले.
पोलिसांनी चालक मोईनउद्दीन उमर शेख (वय ३७, रा. फकीरानगर, धाराशिव) याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता, हे मांस जावेद नुरमहमद कुरेशी (रा. पापनाश, ता. माढा, जि. सोलापूर, ह.मु. खिरणीमळा, धाराशिव) याचे असल्याचे त्याने सांगितले.
याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधीर मुगळे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम ५(क) आणि ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, पोलीस हवालदार पठाण, चव्हाण, पोलीस अंमलदार मुगळे, कनामे, जमादार आणि चालक पोलीस हवालदार नागरगोजे यांच्या पथकाने केली.