धाराशिव – आज दुपारच्या वेळी, धाराशिव जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाण्यातील एका कारवाईत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने एका पोलीस उपनिरीक्षक आणि एका हवालदाराला पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
रामचंद्र किसन बहुरे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक, कळंब पोलीस ठाणे महादेव तात्याभाऊ मुंडे, पोलीस हवालदार, कळंब पोलीस ठाणे अशी या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
आरोपी पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांच्यावर बेवारस जनावरांच्या बाबतीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 अंतर्गत कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ₹5,000/- लाच मागितली. तक्रारदार यांनी एसीबी विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
यातील तक्रारदार यांचे मालकीचे उपळाई पाटी, सोलापुर धुळे महामार्ग, तालुका कळंब येथे दिनेश व्हेज/नॅानव्हेज या नावाचे रेस्टॅारंट असुन सदर धाब्या समोर काही दिवसापुर्वी ०३ शेळया व ०२ बकरे बेवारस मिळुन आले होते. सदर शेळया व बकरे तक्रारदार यांचे ताब्यात मिळालेबाबत तक्रारदार यांचेवर चोरीचा गुन्हा नोंद न करता तक्रारदार यांचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये किरकोळ कारवाई केली व तक्रारदार यांना मदत केली म्हणुन यातील आलोसे परि. पोलीस उप निरीक्षक रामचंद्र बहुरे व पोलीस हवालदार महादेव मुंडे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष बक्षीस म्हणुन 5000/- रुपये लाच रकमेची मागणी करुन आलोसे पो.ह. मुंडे यांनी पंचासमक्ष 5000/- रुपये लाच रक्कम स्विकारली असता आलोसे पोउनि बहुरे व पो ह मुंडे यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे कळंब, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.