मुंबईच्या आझाद मैदानावर राजकीय वादळाचे ढग दाटून आले होते. अंतरवलीचा ‘योद्धा’ आपल्या हजारो जातभाईंचा महासागर घेऊन दाखल झाला होता. त्याचा निर्धार पक्का होता. मागच्या वेळी ठाणेकर दाढीवाल्यांनी दिलेले ‘आरक्षणाचे गाजर’ सडून गेले होते आणि त्याचा पोकळपणा उघड झाला होता. त्या अपमानाने आणि दगलबाजीने योद्ध्याचा स्वाभिमान पेटून उठला होता. “आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघार नाही,” या त्याच्या एका घोषणेने इंद्रराजाच्या दरबारात खळबळ माजली होती.
इकडे धाराशिवमध्ये पावशेरसिंहाच्या काळजात मात्र धडकी भरली होती. त्यांना मागचा तो ‘काळा दिवस’ आठवत होता. इंद्रराजाला खुश करण्यासाठी त्यांनी योद्ध्याच्या टीकेचा निषेध केला होता आणि स्वतःच्याच जातभाईंच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्याचे फळ त्यांना विधानसभा निवडणुकीत भोगावे लागले होते; जातभाईंनी मतपेटीतून आपला राग व्यक्त केला होता. केवळ अठरापगड जातींची मोट आणि लाडक्या बहिणींना दिलेल्या ‘ओवाळणी’मुळे त्यांची नाव कशीबशी तरली होती. त्यामुळे मागच्या वेळी दुधाने तोंड पोळल्यामुळे, ते आता ताकही फुंकून पीत होते.
त्यांच्या या द्विधा मनस्थितीच्या काळातच, सूर्यराजे यांनी थेट सिंहासारखी झेप घेतली. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत थेट उपोषणाच्या मंचावर पोहोचले, योद्ध्याची गळाभेट घेतली आणि जाहीर पाठिंबा दिला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर उपोषणासाठी आलेल्या हजारो जातभाईंच्या पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी जवळच एक भव्य ‘अन्नछत्र’ सुरू केले. सूर्यराजेंच्या या कृतीने सर्व आंदोलकांचे मन जिंकले.
‘ऑन गोइंग प्रोसेस’चा दुसरा अंक
सूर्यराजेंच्या या खेळीने पावशेरसिंह अधिकच अस्वस्थ झाले. त्याच वेळी काही पत्रकारांनी त्यांना धाराशिवमध्ये गाठले आणि तोच साधा, सरळ पण अवघड प्रश्न विचारला, “साहेब, आपण अंतरवलीच्या योद्ध्याला पाठिंबा देणार का?”
पावशेरसिंहांनी आपल्या जुन्याच स्क्रिप्टचा दुसरा अंक सुरू केला. ते म्हणाले, “माझं… माझं अंतरवलीच्या योद्ध्याशी फोनवर बोलणं झालं आहे. समितीचे अध्यक्ष नगरकर यांच्याशीही चर्चा झाली आहे. आरक्षणाची ‘ऑन गोइंग प्रोसेस’ सुरू आहे.”
ही बाईट सोशल मीडियावर पडताच जणू बॉम्बच पडला. लोकांनी शिव्यांचा अक्षरशः वर्षाव सुरू केला.
“अरे किती दिवस तीच ‘प्रोसेस’ सुरू ठेवणार?”
“तुमची ‘प्रोसेस’ म्हणजे भ्रष्टाचाराची फाईल का, जी कधीच पुढे सरकत नाही?”
“लाज वाटते का नाही, समाजाच्या जखमेवर मीठ चोळताना?”
डॅमेज कंट्रोलसाठी ‘ब्लँडर बँके’ने पुन्हा एकदा डोके चालवले. त्यांनी नवी मुंबईत, उपोषण स्थळापासून कित्येक किलोमीटर दूर, आंदोलकांसाठी चहा आणि जेवणाच्या पॅकेटची व्यवस्था केली. जणू काही उपोषण करणारे लोक मुंबई फिरायला आले होते आणि त्यांना पिकनिक स्पॉटवर जेवण पुरवले जात होते. पण लोक ‘काळा दिवस’ विसरले नव्हते. त्यांनी स्वाभिमानाचा झेंडा फडकावत पावशेरसिंहाच्या चहापानावर संपूर्ण बहिष्कार टाकला. पावशेरसिंहाचा हा दुसरा प्रयत्नही फसला.
मगरीचे अश्रू आणि सोशल मीडियाचा निकाल
अखेर चार दिवसांच्या संघर्षानंतर इंद्रराजाला झुकावे लागले. त्यांनी योद्ध्याची मागणी मान्य करण्याची घोषणा केली. हैदराबाद गॅझेटनुसार पुरावे असलेल्या लोकांना आरक्षण मिळेल, असा शासकीय कागद घेऊन काही मंत्री उपोषणस्थळी निघाले. ही संधी पावशेरसिंहांनी सोडली नाही. ते मंत्र्यांच्या मागे-मागे असे गेले, जणू काही हे सर्व त्यांच्याच प्रयत्नांमुळे झाले आहे.
तिथे पोहोचल्यावर त्यांनी कॅमेऱ्यासमोर अभिनयाचा कळस गाठला. त्यांनी डोळ्यांत कधीही न येणारे पाणी आणण्याचा प्रयत्न केला. खोटे हुंदके दिले आणि हातरुमाल काढून आपले कोरडे डोळे आणि नाक पुसले. जणू काही समाजाच्या वेदनांनी त्यांचे काळीज पिळवटून निघत होते.
‘ब्लँडर बँके’ने हा व्हिडीओ तात्काळ सोशल मीडियावर व्हायरल केला. भावनिक संगीत लावून त्यांनी असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला की, जणू पावशेरसिंह आपल्या जातभाईंसाठी किती भावुक झाले आहेत. पण जनता आता हुशार झाली होती. त्यांना खऱ्या आणि खोट्या अश्रूंमधला फरक कळत होता. कॉमेंट बॉक्समध्ये लोकांनी आपला निकाल दिला:
“वाह क्या ऍक्टिंग है! ऑस्करला पाठवा!”
“हे तर मगरीचे अश्रू आहेत, मगरीचे!”
“आरक्षण योद्ध्याच्या लढ्याने मिळाले, तुम्ही फक्त श्रेय घ्यायला आलात.”
बोरूबहाद्दरने आपल्या वृत्तपत्रात या घटनेवर फक्त एकच वाक्य लिहिले:
“आरक्षण मिळाले योद्ध्याच्या संघर्षाने; श्रेय घेण्यासाठी गेले मगरीचे अश्रू काढणारे!”
पावशेरसिंहांनी स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केले होते की, ते राजकारणी कमी आणि विनोदी नट जास्त आहेत.