ठाण्याच्या सरसेनापतीमुळे पावशेरसिंहाच्या डोक्याचा संताप मस्तकात गेला होता. पण हा संताप व्यक्त करणार कुठे? इंद्रराजाकडे तक्रार केली तर आपलीच पत जाणार आणि गप्प बसले तर सरसेनापती डोईजड होणार. या राजकीय कोंडीत त्यांना जुने दिवस आठवले. त्यांचे पूर्वीचे वतनदार सोलापूरकर यांच्याशीही त्यांचे कधी पटले नव्हते. दोघांचे सख्य म्हणजे जणू मुंगूस आणि साप. गंमत म्हणजे, ठाणेकर दाढीवाल्यांनी (सरसेनापतींचे नेते) वतनदार सोलापूरकरांचेही धाराशिवचेचे वतन काढून घेतल्याने ते सुद्धा नाराज होते. त्यामुळे परंड्याचा आखाडा सोडून ते पुण्यात जाऊन बसले होते.
लोकसभा निवडणुकीत याच वतनदारांनी राणीसाहेबांच्या प्रचारात छातीठोकपणे सांगितले होते, “काळजी करू नका, मी छातीचा कोट घालून तुमच्यासमोर उभा आहे!” पण निकालाच्या दिवशी कळले की, या कोटाचा खिसाच फाटका होता. त्यांनी आतून सूर्यराजेंना मदत करून पावशेरसिंहांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, हे नंतर उघड झाले.
हा दगा पावशेरसिंह विसरले नव्हते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी याचा बदला घेतला. युतीधर्म विसरून त्यांनी वतनदार सोलापूरकरांना परंड्याच्या आखाड्यात लोळवण्यासाठी आपले आतेभाऊ भैय्यासाहेब यांना पडद्यामागून रसद पुरवली. पण वतनदारांचे नशीब बलवत्तर, ते अगदी थोडक्यात, ‘बालंबाल’ बचावले. पुढे इंद्रदरबारात मंत्रीपद न मिळाल्याने ते काही दिवस ठाणेकर दाढीवाल्यांवर रुसले होते, पण शेवटी स्वतःची संपत्ती आणि उरलेसुरले राजकारण टिकवण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा जुळवून घ्यावे लागले. राजकारणात स्वाभिमान नावाचा प्राणी नसतोच!
कुरघोडीचा खेळ आणि विकासाचा बळी
या सगळ्या पार्श्वभूमीवर, ठाण्याच्या सरसेनापतींनी पावशेरसिंहाच्या जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली. ते जुने मित्र म्हणून सूर्यराजे यांचे लाड पुरवू लागले. सार्वजनिक कार्यक्रमात सूर्यराजेंना जवळ बसवणे, त्यांच्या कामाचे कौतुक करणे, हे प्रकार सुरू झाले. हे पाहून पावशेरसिंहाच्या काळजात कळ उठली.
त्यांनी सरळ अर्थखात्याची चावी असलेल्या दादासाहेबांकडे तक्रारीचा पाढा वाचला. दादासाहेबांनी वजन वापरून इंद्रराजाच्या कानावर गोष्ट घातली आणि परिणामी, धाराशिवच्या विकासाचा २६८ कोटींचा निधी थांबवला गेला. सरसेनापतींनीही लगेच हिशोब चुकता केला. त्यांनी पावशेरसिंहाच्या ताब्यात असलेल्या शहरातील रस्त्यांचे १४० कोटींचे टेंडर रद्द केले.
या कुरघोडीच्या खेळात धाराशिवच्या विकासाचा वायफाय पूर्णपणे बंद पडला. स्क्रीनवर एकच मेसेज दिसत होता – “Error 404: Development Not Found!”
चाळीस वर्षांचा कारभार आणि तिसऱ्या क्रमांकाचा हार!
पावशेरसिंहाचा एकच अहंकार होता – “मी म्हणजे पूर्व दिशा, मी म्हणेल तसेच झाले पाहिजे!” याच अहंकारामुळे आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे धाराशिव जिल्ह्याची अवस्था बिकट झाली होती. आधी वडील सव्वाशेरसिंह आणि नंतर पुत्र पावशेरसिंह, अशा जवळपास ४० वर्षांच्या अखंड सत्तेनंतरही, केंद्र शासनाच्या अहवालानुसार धाराशिव जिल्हा देशाच्या मागास जिल्ह्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता.
ही चाळीस वर्षांची घराणेशाहीची ‘रिपोर्ट कार्ड’ होती. जनता प्रचंड नाराज होती. ही नाराजी शांत करण्यासाठी पावशेरसिंह विकासाचे नवनवीन बुडबुडे हवेत सोडत होते. कधी ‘मिनी माथेरान’, कधी ‘जंगल सफारी’, तर कधी ‘सिंगापूरचे प्राणी असलेले’ प्राणी संग्रहालय! पण हे रंगीबेरंगी बुडबुडे क्षणभर छान दिसायचे आणि नंतर हवेतच ‘फुस्स’ होऊन जायचे.
बोरूबहाद्दरने आपल्या वर्तमानपत्रात यावर एक जळजळीत अग्रलेख लिहिला. त्याचा मथळा होता:
“चाळीस वर्षांचा घराणेशाहीचा कारभार, आणि धाराशिवला तिसऱ्या क्रमांकाचा मागासलेपणाचा हार!”
आता पावशेरसिंहांना केवळ राजकीय विरोधकांनाच नाही, तर आपल्याच ४० वर्षांच्या अपयशाच्या इतिहासाला सामोरे जायचे होते. हवेतले बुडबुडे आता जनतेला शांत करू शकणार नव्हते.
…हे पाहूया पुढच्या भागात.