पत्रकारांची एकजूट आणि बोरूबहाद्दरच्या ‘संपत्ती अदलाबदल’ करण्याच्या आव्हानामुळे पावशेरसिंह आणि त्यांचे सुपुत्र गब्बरसिंह यांची उरलीसुरली इज्जत पार धुळीला मिळाली होती. त्यांची ‘थिंक टँक’ नसून ‘ब्लँडर बँक’ आहे, यावर शिक्कामोर्तब झाले होते. या राजकीय आणि सामाजिक अपमानाने पोळलेली ही ‘ब्लँडर बँक’ आता आपली गेलेली पत परत मिळवण्यासाठी पुन्हा एकदा कामाला लागली. यावेळी त्यांनी राजकारण किंवा समाजकारण नाही, तर थेट धर्माचा आधार घेण्याचे ठरवले.
‘ब्लँडर बँके’ची तातडीची बैठक भरली. बैठकीत कवी कंदीलकर, तांबरीकर, किणीकर आणि खामगावकर हे चार प्रमुख ‘विचारवंत’ बसले होते. कवी कंदीलकरांनी एक दैवी कल्पना मांडली.
“महाराज,” कंदीलकर म्हणाले, “सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण आहे. लोकांची मनं श्रद्धेने भरलेली आहेत. आपण राजकारणाच्या मार्गाने नाही, तर देवाच्या दारातून लोकांच्या मनात पुन्हा प्रवेश करूया!”सर्वांना ही आयडिया आवडली. योजनेला अंतिम स्वरूप देण्यात आले.
देणगीच्या बदल्यात दर्शनी फोटो
योजना अगदी साधी होती – सध्याच्या काळात गणेश मंडळांना वर्गणी गोळा करताना नाकीनऊ येतात, आपण त्यांच्या याच दुःखावर फुंकर घालायची.
ठरल्याप्रमाणे, ‘ब्लँडर बँके’ने जिल्ह्यातील प्रत्येक गणेश मंडळाला २१ हजार ते ५१ हजार रुपयांपर्यंतच्या देणगीचे गाजर दाखवले. पण यासाठी एक अट होती. प्रत्येक मंडळाला त्यांच्या गणपती मंडपाच्या दर्शनी भागात, जिथे लोकांची पहिली नजर पडेल, तिथे पावशेरसिंह, राणीसाहेब आणि गब्बरसिंह यांचा हसऱ्या चेहऱ्याचा भला मोठा डिजिटल होर्डिंग लावावा लागेल. मंडळांनी होर्डिंग कुठे शोधायचे, हा प्रश्नच नव्हता. कारण ते छापून देण्याची जबाबदारीही याच ‘ब्लँडर बँके’ने घेतली होती.
काही मंडळांनी, ज्यांची आर्थिक परिस्थिती खरोखरच बिकट होती, त्यांनी नाइलाजाने ही अट मान्य केली. पण अनेक स्वाभिमानी मंडळांनी मात्र या ‘फोटो-भक्ती’ला स्पष्ट नकार दिला. एका मंडळाच्या अध्यक्षांनी तर सुनावले, “आमचा गणपती वर्गणीवर चालेल, पण कोण्या नेत्याच्या जाहिरातीवर चालणार नाही. देव विकायला काढला नाही आम्ही!”
ज्या मंडळांनी पैसे घेऊन होर्डिंग लावले होते, तिथे मात्र वेगळाच प्रकार घडत होता. लोक गणरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहायचे आणि त्यांची पहिली नजर पडायची ती पावशेरसिंह आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावर. लोक एकमेकांकडे पाहून नाके मुरडत होते.
“अरे, आपण देवाच्या दर्शनाला आलोय की नेत्याच्या?”
“यांना आता देवालाही सोडवत नाही का?”
“देवाच्या आधी यांचे दर्शन घ्यायचे का आता?”
अशा कुजबुजीने आणि उपरोधिक हास्याने मंडपातील वातावरण भरून जात होते. पावशेरसिंहाची इज्जत परत मिळवण्याऐवजी, ती आणखीनच कमी होत होती.
स्पर्धेचे गाजर आणि बुद्धीची याचना
जेव्हा या होर्डिंग योजनेला संमिश्र आणि बहुतांशी नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे हे ‘ब्लँडर बँके’च्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी या योजनेला अधिक आकर्षक करण्यासाठी स्पर्धेचे गाजर पुढे केले.
‘उत्कृष्ट शिस्तप्रिय गणेशोत्सव सादरीकरण व मिरवणूक स्पर्धा’ असे गोंडस नाव देण्यात आले.
- प्रथम पारितोषिक: ₹ ५१,०००/-
- द्वितीय पारितोषिक: ₹ ३१,०००/-
- तृतीय पारितोषिक: ₹ २१,०००/-
- उत्तेजनार्थ (तीन मंडळांना): प्रत्येकी ₹ ५,०००/-
आता लोकांना कळून चुकले होते की, स्पर्धेतील ‘शिस्ती’चा खरा निकष गणपतीची सजावट किंवा मिरवणुकीतील शांतता नसून, पावशेरसिंहाचे होर्डिंग किती मोठे आणि किती आकर्षक जागी लावले आहे, हाच असणार आहे.
बोरूबहाद्दरने या सर्व प्रकारावर फक्त एक फोटो आपल्या वृत्तपत्रात छापला. त्यात एका बाजूला गणपतीची सुंदर मूर्ती होती आणि दुसऱ्या बाजूला पावशेरसिंहाचा होर्डिंग. त्याखाली फक्त एकच प्रश्न होता – “भक्ती की जाहिरात?”
या सर्व प्रकाराकडे पाहून धाराशिवमधील एक सामान्य नागरिक आकाशाकडे पाहून गणरायाला हात जोडून म्हणाला, “हे विघ्नहर्त्या, तू सर्वांना बुद्धी देतोस म्हणतात. मग यांना कधी देणार? की यांच्यासाठी तुझा स्टॉक संपला आहे?”