धाराशिव जिल्ह्यातील काही लोकांना साप नसतानाही “साप साप” म्हणून काठी आपटायची सवय आहे. म्हणजे समोर साधं किरडू दिसलं तरी या मंडळींना सापाचं गाठोडं झालंय ,असं वाटतं ! असाच काहीसा प्रकार तुळजापूरजवळ नुकताच घडला, पण इथे साप नव्हे तर राजकीय कुत्र्यांचा खेळ मांडला गेला.
आता निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. निवडणुका जवळ येतायत, तर मतदारांसमोर आपणही काहीतरी बोलायला हवं, हे त्यांच्या ध्यानी आलं. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी तुळजापूरजवळ कार्यक्रम ठेवलाच, पण त्यांच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हजर झाले. धीरज पाटील हे तुळजाभवानी देवीचे पुजारी असल्याने गोंधळ घालण्याचं त्यांना चांगलंच कसब! तिथे त्यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन जोरदार गोंधळ केला.
या गोंधळाचं दृश्य पाहून राणा पाटील संतापले आणि मीडियाला बोलताना म्हणाले, “चावणाऱ्याची मुलाखत कशाला घेता!” आता राणा पाटील यांनी फक्त “चावणारा” शब्द उच्चारला होता, पण धीरज पाटील यांनी लगेचच त्याचा अर्थाचा अनर्थ केला आणि चांगलाच धुराळा उडवला. “मला कुत्रा म्हणालात!” असं ओरडून त्यांनी राणांच्या आरोपाचं प्रत्युत्तर दिलं. एवढंच नव्हे, तर पुढे जाऊन राणा पाटील यांना “डॉबरमॅन” म्हणत त्यांची खिल्ली उडवली. यावर थोडंफार हास्य मिळालं म्हणून, त्यांनी “छू छू” असं थेट संवादातूनच छेडलं!
आता इथूनच या वादाला तुच्छेखोर रंग चढला. पत्रकारांनीही या संधीला सोडली नाही. त्यांच्या कॅमेऱ्यात हा सारा खेळ टिपला गेला, आणि बातम्यांमध्ये या गोष्टीची चर्चा चांगलीच रंगली. या सगळ्याला शिवसेना ठाकरे सेनेचे शिवसैनिक धीरज पाटील यांच्या मदतीला धावत आले. सोशल मीडियावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला, ज्यात कुत्रा, हत्ती अशा प्राण्यांच्या चित्रांचा उपयोग करण्यात आला. काही लोकांनी कुत्र्याचं तर काहींनी हत्तीचं चित्र शेअर केलं, आणि या वादाला अधिकच तिखट-मीठ लावण्यात आलं.
हां, एवढ्यावरच संपत नाही – शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वेगळी पत्रकार परिषद घेऊन राणा पाटील यांच्यावर निशाणा साधला. “राणा पाटील यांनी तुळजापूरच्या जनतेला कुत्रा म्हटलं,” असं आरोळी ठोकून ओमराजेंनी नव्या वादाला सुरुवात केली. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ओमराजे हा मुद्दा उचलून धरणार आहेत, हे नक्की! राजकारणाच्या रंगात रंगलेले हे आरोप-प्रत्यारोप आता मतदारांच्या डोक्यात किती प्रभाव पाडतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
तर अशी ही धाराशिवच्या भूमीतली “साप साप”ची खेळी, जिथे राजकारण्यांनी साप नसतानाही ‘साप’चा खेळ खेळला आणि आता कुत्र्यांचं तुणतुण वाजवायला सुरुवात केलीय. राणा पाटील कधी भू भू म्हणतायत, तर धीरज पाटील कधी छू छू करतायत. शेवटी धाराशिवच्या राजकारणात हे ‘साप साप’ आणि ‘कुत्रा – डॉबरमॅन ‘चे खेळ पुढील काही दिवस तरी रंगणार आहेत!