धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील राजकीय ‘पोस्टर वॉर’ अधिकच तीव्र झाले आहे. भाजपच्या “बाळ नाद करायचा नाही” या डिवचणाऱ्या पोस्टरला आता ठाकरे गटाकडून अत्यंत मार्मिक शब्दांत उत्तर देण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
जिल्ह्यातील आठ नगर पालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे गट) अपेक्षित यश मिळाले नाही, तर भाजपने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव, तुळजापूर आणि नळदुर्गमध्ये विजय मिळवला. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राणा पाटील यांचे फोटो असलेले “बाळ नाद करायचा नाही” असे होर्डिंग्ज लावून खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
युवती सेनेचा भाजपला टोला
भाजपच्या या पोस्टरबाजीला सोशल मीडियावर शिवसैनिकांकडून उत्तर मिळत असतानाच, आता पदाधिकाऱ्यांनीही या वादात उडी घेतली आहे. शिवसेना (ठाकरे गट) युवती सेना जिल्हाप्रमुख श्वेता दुरुगकर यांनी या पराभवाचे विश्लेषण करताना एका म्हणीचा वापर करत भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.
त्यांनी म्हटले आहे की,
“उंट खाली बसलेला जरी असला, तरी तो गाढवापेक्षा उंचच दिसतो.”
या एका वाक्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या विजयावर टीका करत, सध्या परिस्थिती काहीही असली तरी शिवसेनेची (ठाकरे गट) ताकद आणि उंची कमी झालेली नाही, असे सुचवले आहे.


सोशल मीडियावरही धुमश्चक्री
दुसरीकडे, ठाकरे गटाचे कार्यकर्तेही सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत. “बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या म्हणजे नाद कळेल” आणि “लोकसभेत मिळालेले लीड आठवा, एका पराभवाने कुणी खचत नाही,” अशा कमेंट्स करत भाजपला प्रत्युत्तर दिले जात आहे. श्वेता दुरुगकर यांच्या विधानामुळे आता हे वाकयुद्ध आणखी रंगण्याची शक्यता आहे.






