धाराशिव शहराच्या रस्त्यांवर खड्डे की खड्यांमध्ये रस्ते—हा प्रश्न आता कोड्यातून बाहेर येणार नाही अशी अवस्था आहे. गेली दोन वर्षे रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून धाराशिवकरांचं डोकं खड्ड्यात गेलंय, पण स्थानिक अधिकारी मात्र अजूनही ‘कशाला घाई?’ म्हणत निघून जातात.
आता, दोन दिवसांपूर्वीच ओंकार जाधवर या २२ वर्षीय तरुणाने या खड्यांच्या ‘शूरवीरपणाची’ झलक अनुभवली आणि त्याचा दुर्दैवी बळी गेला. दुचाकीवरून जात असताना ओंकार एका खड्ड्यात गाडी घालवून बसला, आणि त्यानंतर तासाभरात त्याने खड्ड्यांचे “फायदे” जवळून पाहिले—दुर्दैवाने हे फायदे त्याच्या जिवावरच बेतले.
घटनेमुळे धाराशिवकरांमध्ये संतापाची लाट उसळली, इतकी की शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) कार्यकर्तेही खड्ड्यांपेक्षा अधिक जोराने गरजले. सावर्जनिक बांधकाम विभागाला फैलावर घेतल्यावर अखेर खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं… पण थांबा! यात ट्विस्ट आहे!
कंत्राटदारांच्या ‘नवीन तंत्रज्ञानाने’ खड्ड्यांमध्ये खडक, खडी नाही—तर चक्क माती भरली गेली! होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. धाराशिवच्या रस्त्यांवर आता खड्डे नाहीत… चिखलाचे छोटे छोटे तलाव तयार झालेत. ‘विसर्जन विहीर ते डॉ. आंबेडकर रस्ता’ हा परिसर आता मोटारसायकलस्वारांसाठी ‘वॉटर पार्क’चं रुप घेतंय. घसरून पडतांना अनुभवलेल्या थराराची गोष्टच वेगळी!
धाराशिवकरांच्या तोंडातून आता ‘भीक नको, कुत्रं आवर’ ही म्हण सुटली आहे. या खड्डे पुराणाचं पुढचं पान काय असेल, हे पाहण्याची उत्सुकता आहे. पण एक गोष्ट नक्की—धाराशिवकरांचा रस्ता आता खड्डेभरून मोकळा नाही, तर चिखलाने ओथंबून आहे!