टाकळी (बेंबळी) : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून गावोगावी मतदारांच्या यादीतील फेरफारांची धडाकेबाज मोहीम सुरु आहे. मतदारांना चावडी वाचनाच्या निमित्ताने स्वतःचं नाव मतदान यादीत आहे की नाही याची खात्री करण्याचा सोहळा म्हटला तरी चालेल. पण आजच्या टाकळी (बेंबळी) गावातील चावडी वाचनाच्या सोहळ्याचा गोंधळ बघता हा एक विनोदी नाटकाचा प्रयोग झाला की काय असा संशय गावकऱ्यांना येऊ लागला आहे.
गावातील सुमारे २४०० मतदार आज चावडी वाचनासाठी थोडे उतावीळ झाले होते. “आपलं नाव कुठे गायब तर नाही ना?” अशी चिंता आणि “यादीत बदल झालाय का?” अशी उत्सुकता घेऊन गावातील लहानथोर चावडीपाशी हजर झाले होते. माणसं जमली होती, चर्चा सुरू होत्या. कोणाच्या नावाखाली दुसऱ्याचं नाव घुसडलं गेलंय का, बोगस मतदार आहेत का याची चर्चा जोरात चालू होती. काहींनी तर आपल्या चपलांची मोजणीही सुरु केली होती – “अहो किती वेळ थांबायचं?”
पण या सर्वांची चिंता काही वेळानंतर चहा-कटिंगच्या चर्चांमध्ये रूपांतरित झाली. कारण चावडी वाचन करणारा एक अधिकारी चक्क गैरहजर!“साहेब कुठे गेले?” अशी विचारणा करणाऱ्यांनी “रविवार आहे, सुट्टीचा दिवस” असं लक्षात आल्यावर कपाळावर हात मारला.
साहेबांनी चावडी वाचनाचं आयोजन नेमक्या सुट्टीच्या दिवशी ठेवलं, आणि अधिकारी मंडळींनी सुट्टीचा आनंद घेत गप्प राहिलं असं दिसतंय. गावकऱ्यांनी आधी तर मनसोक्त वाट पाहिली. ‘तलाठी कुठे आहेत?’, ‘मतदान अधिकारी कधी येणार?’ असले प्रश्न हवेत उडत होते. अखेर गावकऱ्यांना सुचलं की हे ‘रविवारचं काम’ सोमवारीच पूर्ण होणार. अधिकाऱ्यांनी चावडी वाचनाच्या कार्यक्रमाला ‘कोलदांडा’ मारल्यावर गावकऱ्यांनी उद्याचं सोहळं पाहायचं ठरवलं.
आता या सोमवारी अधिकारी येणार का? मतदारांचं नाव यादीत राहतं का गायब होतं? हे पाहण्यासाठी गावात सोमवारी पुन्हा चहा-कटिंगसह लोकं हजर राहणार यात शंका नाही.