उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यात आलेेले आहे. शासनाच्या इतर विभागांनी यापूर्वीच याची अंमलबजावणी करुन नामफलक बदलले; परंतु रेल्वे विभागाकडून अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेल्वे विभागानेही उस्मानाबाद ऐवजी धाराशिव नामकरणाची अंमलबजावणी तातडीने करावी, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन शिवसेना (उबाठा ) शहरप्रमुख तथा नपचे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी केली आहे.
खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर, आमदार कैलास (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रेल्वेच्या सोलापूर विभागीय व्यवस्थापकांना याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण व्हावे, हे शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याची घोषणा केली. त्यानंतर सध्याच्या राज्य सरकारने व केंद्र सरकारने या दोन्ही शहरांच्या नावाला अनुमती दिली. त्यानंतर बदलेल्या नावाची अंमलबजावणी शासनाच्या इतर विभागांनी यापूर्वीच सुरू केली आहे. परंतु आपल्या रेल्वे विभागाकडून अद्यापही याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. ही अत्यंत खेदाची व गंभीर बाब आहे.
आपल्या विभागाकडून धाराशिव नावाची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्यामुळे प्रवासी व नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याची दखल घेऊन आपल्या विभागाकडून तातडीने उस्मानाबाद ऐवजी धाराशिव अशी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच धाराशिव रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तेथील कामेही जलदगतीने करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी. उस्मानाबाद ऐवजी धाराशिव या नामकरणाची आपल्या विभागाकडून तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.