धाराशिव जिल्ह्याच्या नशिबी विकास नाही, केवळ घोषणांचे तुकडे आणि फोटोशॉप स्वप्ने! मराठवाड्यातील हा जिल्हा मागासलेला तर होताच, पण आता तो “देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मागास जिल्हा” म्हणून अधिकृतपणे शिक्का मोर्तब झालाय. विकासाचे गाजर दाखवणाऱ्या नेत्यांनी जनतेला स्वप्नांच्या पिंजऱ्यात अडकवले आहे, पण वास्तवात हा जिल्हा कोसो दूर मागेच राहिला आहे.
धाराशिव शहराच्या रस्त्यांवरून प्रवास करताना वाटतं, आपण कुठल्यातरी आदिवासी पाड्यात आलो आहोत की काय! धुळीने भरलेले, खड्ड्यांनी व्यापलेले हे रस्ते पाहून नागरीकरणाच्या नावाने नुसते हसू येते. प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी कितीही हवा केली, तरी वास्तव पाहता धाराशिवच्या रस्त्यांचे नशीब बदलायचे लक्षण नाही.
नेत्यांची श्रेयवादाची भांडणं आणि जिल्ह्याचा बळी
धाराशिवच्या दैना होण्यामागे सर्वात मोठा हात आहे येथील राजकीय अकार्यक्षमतेचा. खासदार ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील (भाजप) यांच्यातील राजकीय संघर्षाचा फटका विकासाला बसला आहे. श्रेय घेण्यासाठी दोघांचे भांडण सुरू आहे, पण प्रत्यक्षात जिल्ह्याचा विकास शून्य गतीने पुढे सरकत आहे. दोघांच्या लढाईत जिल्हा मात्र लोंबकळत आहे.
घोषणांचा पाऊस आणि अमंलबजावणीचा दुष्काळ
आमदार राणा पाटील यांच्या घोषणांचा आलेख जसा चढतो, तशीच जनतेची फसवणूकही वाढते. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शासकीय मेडिकल कॉलेजचा अजूनही जागेचा प्रश्न सुटलेला नाही. या विषयावर राणा पाटील आणि माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यात रस्सीखेच झाली, पण जमीन कुठली आणि इमारत कुठे हा प्रश्न अद्याप अनुत्तरित! मात्र, नागपूर एम्सच्या धर्तीवर अत्याधुनिक इमारतीचे थ्रीडी व्हिडीओ आणि फोटोशॉप प्रतिमा दाखवून लोकांच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे.
तीर्थक्षेत्र विकास : फक्त फोटोशॉप आणि व्हिडीओ
तुळजापूरची तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान. हे तीर्थक्षेत्र तिरुपती बालाजीच्या धर्तीवर विकसित करण्याच्या गाजराचे लोणचं गेल्या पाच वर्षांत खूप लोणचं झालं! प्रत्यक्षात विकास आराखडाच मंजूर झालेला नाही, मग कामे कधी सुरू होणार?
येडशीच्या रामलिंग देवस्थानाला “मराठवाड्याचे माथेरान” बनवण्याचे स्वप्न दाखवले जात आहे. पण, प्रत्यक्ष काम काहीच नाही. याआधी येरमाळा येडाई देवी, तेरचे गोरोबा काका मंदिर विकास याही फक्त व्हिडीओ आणि फोटोशॉपच्या पातळीवरच राहिले.
संगीत कारंज्यांचे थ्रीडी स्वप्न आणि ९० लाखांचा हिशेब?
हातलादेवी तलावात संगीत कारंजे सुरू होणार, अशी घोषणा झाली. त्यासाठी ९० लाख रुपये खर्च झाले, पण संगीत सोडाच, साधं पाण्यात बुडालेलं कारंजेसुद्धा कुठे दिसत नाही! हे पैसे कुठे गेले? कुणाच्या खिशात गेले? याचा हिशेब कुणी देणार आहे का?
विकास हवा की आश्वासनांचे दिवाळखोर खेळ?
धाराशिव जिल्ह्याला राजकीय खेळांची शर्यत बनवले जात आहे. विकासाच्या नावावर फोटोशॉप आणि व्हिडीओ प्रेझेंटेशन दाखवून लोकांना मूर्ख बनवण्याचा सपाटा सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र जनता खड्ड्यांत पडते, रुग्ण उपचाराविना मरतात, आणि तीर्थक्षेत्रांच्या नावाखाली निधी गायब होतो. जिल्ह्याच्या भवितव्याचा विचार न करता केवळ श्रेयासाठी भांडणाऱ्या या नेत्यांना जनता धडा शिकवणार का? की अजूनही गाजरांच्या मागे धावायचं?
समाजासाठी, विकासासाठी – आता जागे व्हा, नाहीतर आणखी १० वर्षे हेच थ्रीडी व्हिडीओ पाहत राहाल!
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह