अहो, मी... मीच तो १४० कोटींचा रस्ता. काय सांगू तुम्हाला! मला वाटलं होतं माझा वनवास संपला. माझा ‘कार्यारंभ आदेश’ आला म्हणून आमदार साहेबांनी पेढे वाटले, पत्रकार परिषदा घेतल्या.
अरे बापरे! संपूर्ण शहरात माझे मोठमोठे होर्डिंग लागले. ‘ऐतिहासिक काम!’, ‘६० कोटी वाचवले!’… माझा सत्कार पण झाला म्हणे! (अर्थात, मला न बोलवताच!). मी तर बिचारा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाची स्वप्नं बघत होतो. मी माझ्यावर पडणाऱ्या कुदळीची आणि नारळाची वाट बघत होतो.
…आणि मग आला कहाणीतला ‘स्थगिती’ ट्विस्ट!
ज्या क्षणी हार-तुरे स्वीकारून झाले, होर्डिंगवरचा शाईचा वास सुकला, त्याच क्षणी मुंबईहून (नगर विकास खात्यातून) एक पत्रक धाडकन माझ्या नशिबावर आदळलं.
“थांबा! तूर्त स्थगिती!”
म्हणजे बघा, सत्कार झाला, पण ‘कार्यारंभ’ झालाच नाही! कुणीतरी म्हणे माझ्या जन्माबद्दलच तक्रार केलीय. आता ‘चौकशी’ होणार म्हणे! अहो, दीड वर्ष मी फायलीत पडून होतो, तेव्हा कुणाला माझी आठवण आली नाही. आता कुठे कामाला लागणार, तर म्हणे ‘चौकशी’!
सगळ्यात मोठा विनोद काय माहित्येय?
आमदार साहेबांनी त्यांच्या पत्रकात पालकमंत्री साहेबांचे ‘मोलाचे सहकार्य’ लाभल्याचे जाहीर केले होते. आणि आता ही ‘स्थगिती’ची भेट! यालाच म्हणतात ‘राजकीय सहकार्य’! (एकाने होर्डिंग लावायचे, दुसऱ्याने स्थगितीचा फास आवळायचा).
तर मंडळी, स्थिती अशी आहे की:
१. होर्डिंगवरचा ‘मी’ (तो गुळगुळीत फोटो) हसतोय.
२. आणि खरा ‘मी’ (म्हणजे खड्डे आणि धूळ) रडतोय.
३. ‘६० कोटी वाचवल्याचा’ आनंद साजरा झालाय.
४. पण ‘०’ (शून्य) काम सुरू झालंय.
सत्कार स्वीकारणारे स्वीकारून गेले. आता चौकशीचा अहवाल येईल, मग तो झारीतला शुक्राचार्य (किंवा शुक्राचार्यगण) शांत होईल, मग वाद मिटेल, मग मुहूर्त निघेल…
तोपर्यंत?
तोपर्यंत धाराशिवकरांनो, हेल्मेट जरा घट्ट घाला आणि गाडी सांभाळून चालवा. कारण ‘नरकयातना’ पार्ट २ सुरू झाला आहे!
- आपलाच – (पुन्हा एकदा फायलीत अडकलेला) १४० कोटींचा रस्ता.






