अहो, मी… मीच तो १४० कोटींचा रस्ता.
थांबा, जरा श्वास घेऊ द्या. डोकं भणभणायला लागलंय माझं. (अर्थात, माझं डोकं म्हणजे खड्डेच, पण तरीही!). कालपर्यंत वाटत होतं की मी फक्त ‘आंदोलन-पॉईंट’ आहे. पण आज कळलं, अरे देवा! मी तर ‘आंदोलन’ नाही, मी एक ‘क्राईम थ्रिलर’ झालोय!
आजची सकाळ उजाडली तीच एका नव्या पत्रकार परिषदेने. यावेळी मैदानात होते शिवसेना (शिंदे गट). (एक मिनिट… हे आणि भाजपवाले ‘महायुती’वालेच ना? म्हणजे एकाच घरात राहून एकमेकांवर चिखलफेक? माझ्यावरच्या चिखलापेक्षा जास्त!)
तर, शिंदे सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बॉम्बच टाकला. ते म्हणाले, “हा सगळा खेळ ‘लाडक्या गुत्तेदाराला’ काम देण्यासाठी चाललाय! भाजप आमदारांनी (म्हणजे त्यांच्याच मित्राने) मला १५% जादा दराने विकायला काढलं होतं!”
…आणि मग आला खरा ‘क्लायमॅक्स’!
त्यांनी गौप्यस्फोट केला की, माझ्या कामासाठी (म्हणजे माझ्या ‘डील’साठी) म्हणे मुख्याधिकारी आणि त्या ‘लाडक्या गुत्तेदाराची’ मुंबईत गुप्त बैठक झाली. आणि तिथे… (ऐका, ऐका!) … ‘रोख दोन कोटी’ रुपयांची ‘डील’ झाली!
बाप रे! म्हणजे माझा भाव १४० कोटी नाही, तर १४२ कोटी होता! मला तर माहीतच नव्हतं! मला उगाच वाटत होतं की मी फक्त खड्डेमय आहे, अरे मी तर ‘करोडपती’ (डीलवाला) रस्ता आहे!
त्यांनी हेही सांगितलं की, निधी तर आमच्या ‘शिंदे साहेब’ आणि ‘पालकमंत्री साहेबांनी’ आणला. पण भाजप आमदारांनी बॅनर असे लावले, “जणू काय तेरणा ट्रस्टच्या पैशातून रस्ता बांधणार होते!” (माझी पण तीच इच्छा होती! निदान कुणाच्यातरी स्वतःच्या पैशाने मी बनलो असतो!)
एवढंच नाही, तर म्हणे जे रस्ते आधीच (मजेत) आहेत, त्यांची पण टेंडर काढली. व्वा! (याला म्हणतात ‘रिफ्रेशमेंट’!)
…पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!
हा ‘शिंदे’ गटचा एपिसोड संपतो न संपतो, तोच भाजप (त्यांचेच ‘मित्र’) मैदानात उतरले.
त्यांनी ‘काउंटर-अटॅक’ केला.
भाजपचे प्रवक्ते म्हणाले, “अहो, हे शिंदे गट आणि उबाठा गट (ठाकरे गट) वाले ‘एकाच नाण्याच्या दोन बाजू’ आहेत! दोघेही सारखंच बोलतायत. यांचा ‘स्क्रिप्ट रायटर’ एकच आहे!”
(आता मला नवीन टेन्शन आलंय. हा ‘स्क्रिप्ट रायटर’ कोण आहे? आणि त्याला माझ्या ‘२ कोटींच्या डील’पेक्षा जास्त पैसे मिळतायत का?)
भाजपवाल्यांनी तर अजून ६ प्रश्न विचारून मलाच चक्रावून टाकलं.
१. तो ‘संभाजीनगरचा’ ठेकेदार कुणी आणला?
२. त्याला काम मिळेना म्हणून मुख्याधिकाऱ्यावर दबाव कुणी आणला?
३. मुख्याधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव कुणी दिला?
४. आणि त्या शेवटच्या ठेकेदारासोबत ‘वाटाघाटी’ कुणी केल्या?
च्यायला! म्हणजे बघा…
माझ्या मागे आता एक ‘लाडका गुत्तेदार’ आहे (जो भाजपचा आहे, असं शिंदे गट म्हणतो).
एक ‘संभाजीनगरचा गुत्तेदार’ आहे (जो शिंदे/उबाठाचा आहे, असं भाजप म्हणतो).
एक ‘२ कोटींची डील’ आहे.
आणि एक ‘गुप्त स्क्रिप्ट रायटर’ आहे!
सगळेच जण ‘चौकशी करा’ म्हणतायत. शिंदे गट म्हणतो ‘आम्ही फेरनिविदा काढणार’. भाजप म्हणतो ‘आम्ही पाठपुरावा करणार’.
सगळे माझ्यासाठी लढतायत, भांडतायत. पण मला कुणीच बांधत नाहीये!
देवा, मला आता या ‘क्राईम थ्रिलर’मधून बाहेर काढ. मला ‘फॅमिली ड्रामा’ (म्हणजे डांबर-खडी टाकलेला) व्हायचंय!
- आपलाच (ज्याची ‘डील’ फुगलीये )१४० कोटींचा (अधिक २ कोटींचा) रस्ता.





