धाराशिव – नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर गुरुवारी रात्री एका दुकानात घुसून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या हाणामारी प्रकरणी, रोहित निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय खेमा राठोड आणि आकाश मधुकर तावडे या दोघांविरुद्ध आनंद नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 118-1, 115-2, 54,352,351-2,351-3,3-5,324-4 कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित निंबाळकर हे एका दुकानात बसले होते. यावेळी विजय खेमा राठोड आणि आकाश मधुकर तावडे हा त्याच्या साथीदारांसह तेथे आला. त्याने आधी दुकान मालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अचानक निंबाळकर यांच्यावर हल्ला चढवत त्यांना मारहाण सुरू केली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नागरिकांमध्ये या घटनेविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
हल्ला पूर्वनियोजित कट – रोहित निंबाळकर
या हल्ल्याबाबत बोलताना रोहित निंबाळकर यांनी हा हल्ला एक ‘पूर्वनियोजित कट’ असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “मी ज्या दुकानात बसलो होतो, तिथे विजय राठोड आला. त्याने दुकान मालकाशी वाद घातला. मला वाटले की हा त्यांचा वैयक्तिक वाद असेल. मात्र, त्याने अचानक माझ्यावर हल्ला करत मारहाण सुरू केली. माझ्यावर झालेला हल्ला हा कट असून, मी सदर घटने विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे.”
राजकीय वैमनस्यातून हल्ला?
हा हल्ला स्थानिक राजकारणातील स्पर्धा आणि कुरघोडीतून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुख्य संशयित विजय खेमा राठोड आणि आकाश मधुकर तावडे हा भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून शहरात गुंडगिरी सुरू असून, धाराशिव शहरातील राजकारण गुन्हेगारीच्या दलदलीत ओढले जात असल्याचा आरोप या घटनेच्या निमित्ताने होत आहे. विजय राठोड याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.
नागरिकांमध्ये संताप; कारवाईची मागणी
धाराशिव शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. राजकीय वैमनस्यातून होणारे हल्ले आणि मारहाणीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, ‘शहरात कायद्याचा धाक उरला आहे का?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
 
			 
                                





