धाराशिव : रस्त्यात बाजूला सरकण्याच्या कारणावरून धाराशिव तालुक्यातील घाटंग्री येथे दोन गटांत तीव्र वाद होऊन एका २३ वर्षीय तरुणावर कोयता आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोरांनी गैरकायद्याची मंडळी जमवून रविवारी आणि सोमवारी अशा दोन सत्रांत हा राडा घातला. या हिंसक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गावच्याच ९ जणांविरुद्ध दंगल आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्ण कांबळे, संकेत कांबळे, अतिष देडे, रोहित देडे, अमर शेरकर, दत्तू देडे, राहुल कांबळे, बबलू कांबळे आणि महादेव देडे (सर्व रा. घाटंग्री, ता. जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धनाथ सुरेश बिचकुले (वय २३, रा. घाटंग्री) या तरुणाने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शाळेजवळ अन् नदीपात्रात दोनदा थरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धनाथ बिचकुले आणि आरोपींमध्ये शनिवारी रस्त्यात बाजूला सरकण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. याच वादाची कुरापत काढून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला.
-
पहिला हल्ला: शनिवारी (दि. ३० मे) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घाटंग्री येथील जिल्हा परिषद शाळेजवळ आरोपींनी सिद्धनाथला गाठून अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
-
दुसरा हल्ला: हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. ३१ मे) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सिद्धनाथ घाटंग्री शिवारातील झरी नदीवर गेला असता, आरोपींनी पुन्हा तिथे येऊन त्याला घेरले.
कोयता आणि दगडांनी केले वार
नदीपात्रात आरोपींनी हातातील धारदार कोयता आणि रस्त्यावरील मोठे दगड घेऊन सिद्धनाथवर हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात सिद्धनाथच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तो रक्तबंबाळ झाला. “तुला आज जिवंत सोडत नाही,” अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिक धावून आले, त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. जखमी सिद्धनाथला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
उपचार घेतल्यानंतर फिर्यादी सिद्धनाथ बिचकुले याने रविवारी रात्री धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सर्व ९ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) (घातक शस्त्राने दुखापत करणे), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२) (बेकायदेशीर जमाव जमवणे), १९० आणि १९१(२) अन्वये दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






