धाराशिव: धाराशिव शहरातील सांजा रोडवरील पद्मसिंहनगर येथे राहणाऱ्या शशिकला सुरेश शेरखाने यांच्या घरी गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्यरात्री घरफोडी झाली होती. त्यात चोरट्यांनी घरातील १० तोळे सोने, ७० हजार रुपये रोख रक्कम आणि इतर किमती वस्तू लंपास केल्या होत्या. चोरीला गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत 3 लाख 9 हजार रुपये इतकी होती.
याप्रकरणी शशिकला सुरेश शेरखाने यांनी आनंदनगर, धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करून, संशयित आरोपी म्हणून शेजारी राहणाऱ्या अविनाश शिवाजी जगदाळे याचे नाव दिले होते. त्यादिवशी आरोपीच्या घरासमोरील सर्व सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे संशय वाढला होता.
फिर्याद दाखल होताच, आनंदनगर, धाराशिव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. शेजारी रहाणाऱ्या अविनाश शिवाजी जगदाळे याचे नाव संशयित असतानाही पोलीस त्याला अटक करीत नव्हते.
अखेर १२ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी अविनाश शिवाजी जगदाळे यास राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता आरोपीस २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.